पुणे : आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी (९ ऑगस्ट) एकादशी असल्याने सामिष खवय्यांचा हिरमोड झाला. घरगुती ग्राहकांनी मासळी, मटण, चिकन खरेदीकडे पाठ फिरवली. हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी राहिली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
‘आषाढ महिन्यात सामिष पदार्थ तयार केले जाते. घरोघरी सामिष खाद्यपदार्थ तयार करुन मित्रमंडळी, तसेच नातेवाईकांना आमंत्रण दिले जाते. आषाढ महिन्यातील शेवटच्या रविवारी एकादशी असल्याने सामिष खवय्यांचा हिरमोड झाला. सामिष खवय्यांनी मटण, मासळी, चिकन खरेदीकडे पाठ फिरविली. आषाढ महिन्याची सांगता बुधवारी (१२ ऑगस्ट) होणार आहे. सोमवारी (१० ऑगस्ट) सामिष पदार्थ व्यर्ज मानले जातात. त्यामुळे मंगळवारी (११ ऑगस्ट) आणि बुधवारी (१२ ऑगस्ट) मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ होईल. गुरुवारपासून (१३ ऑगस्ट) श्रावण मास सुरू होणार आहे’, अशी माहिती पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि पुणे बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी दिली. ‘मागणीच्या तुलनेत मटण, मासळी, गावरान अंड्याच्या पुरवठा होत आहे चिकनची आवक वाढल्याने दरात किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली. इंग्लिश अंड्याच्या दरात शेकड्यामागे २० रुपयांनी घट झाली’, असे त्यांनी सांगितले.
‘गणेश पेठेतील मासळी बाजारात देशाच्या पूर्व किनारपट्टीवरुन मासळीची आवक होत आहे. आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदीशा येथून मासळीची आवक झाली. पश्चिम किनारपट्टीवरुन मासळीची तूरळक आवक होत आहे. मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी १० ते १२ टन, खाडीतील मासळी २०० ते ३०० किलो, नदीतील मासळी ४०० ते ५०० किाले, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून १५ ते २० टन एवढी आवक झाली’, अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर
पापलेट – ९०० ते २२०० रुपये
सुरमई – १२०० ते १४०० रुपये
रावस – १००० ते १२०० रुपये
हलवा – १००० ते ११०० रुपये
मटण – ८०० रुपये
चिकन – २३० रुपये
