पुणे : नगर रस्ता भागात सराइताने पोलिसांच्या पथकावर गोळीबार केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सराइत गुन्हेगार जखमी झाला.
ओंकार दिलीप भंडारे (वय २०, रा. चंदननगर) असे जखमी झालेल्या सराइताचे नाव आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच मारहाण प्रकरणात भंडारे याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. तो नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात लपल्याची माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मिळाली.
तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी त्याला ताब्यात घेण्यासाठी आव्हाळवाडी परिसरात पोहोचले. पोलिसांनी तेथे सापळा लावला. त्या वेळी झुडपात लपलेल्या भंडारे याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला.
पोलीस उपनिरीक्षक ढावरे यांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. ढावरे यांनी झाडलेली गाेळी भंडारे याच्या डाव्या पायाच्या मांडीत शिरल्याने तो जखमी झाला. या घटनेनंतर जखमी अवस्थेतील भंडारे याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती उपनिरीक्षक ढावरे यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत कोणीही पोलीस कर्मचारी जखमी झाले नाहीत, अशी माहिती चंदननगर पोलिसांनी दिली.
तिसरी चकमक…
मध्यंतरी नगर रस्त्यावरील शिक्रापूरमध्ये सातारा परिसरात लूटमार करून पसार झालेल्या गुंडाला सातारा पोलिसांनी चकमकीत ठार मारले होते. तत्पूर्वी, पुणे पोलिसांनी हडपसरमधील गुंड टिपू पठाण याच्या टोळीतील सराइत शाहरूख हट्टी हासुद्धा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात झालेल्या चकमकीत मारला गेला होता. दोन्ही वेळेस गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तर दिले होते. शहरात घडत असलेल्या या चकमकींमुळे मात्र गुन्हेगारांकडे येणारी शस्त्रे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्याच महिन्यात पोलिसांनी महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील उमराटी गावात छापा टाकून अनेक बेकायदा शस्त्रे जप्त केली होती. येथून ती पुण्यात विविध मार्गांनी गुंडांपर्यंत पोचत असल्याचे त्या वेळी उघडकीस आले होते. सहज उपलब्ध होणाऱ्या शस्त्रांमुळे छोट्या-मोठ्या गुंडांची हिंमत वाढली आहे. परिसरात दादागिरी, दहशत पसरविण्यासाठी या शस्त्रांचा वापर होत असल्याचेही पोलिसांचे निरीक्षण आहे. या प्रकारांना पायबंद करण्यासाठी पोलिसांना कडक पावले उचलावी लागणार आहेत.
