नगर रस्त्यावरील कोंडीवर उतारा

नगर महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले असून, त्याचा केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला आहे.

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त उपाययोजना ; नगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित, भारतमाला प्रकल्पात समावेश

पुणे ते नगर हा १२० किलोमीटर लांबीचा रस्ता असून, रांजणगावपर्यंतचा महामार्ग गावांमधून जातो. या रस्त्यावर वाघोली, लोणीकंद, केसनंद, भीमा कोरेगाव, शिक्रापूर या भागांत नेहमीच वाहतूककोंडी होते. बंडगार्डनपासून वाघोलीपर्यंत महापालिका हद्दीतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे नगर रस्ता आणि महामार्गावरील वाहतूककोंडीवर जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेकडून संयुक्तरीत्या उपाययोजना केली जाणार आहे. दरम्यान, नगर महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले असून, त्याचा केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला आहे.

पुणे-नगर महामार्गावरील शहराच्या प्रवेशद्वारावरील वाहतूककोंडी, खासगी बसचालकांची अरेरावी, अतिक्रमणे आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुविधा नसल्यामुळे हा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक झाला आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारीपदावर असताना सौरभ राव यांनी नगर रस्त्यावर होणाऱ्या कोंडीबाबत महापालिकेकडून काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत किंवा करण्यात येत आहेत, याबाबत माहिती मागवली होती. त्यावर या मार्गासाठी पालिका प्रशासन अभियांत्रिकी उपाययोजनांवर (इंजिनिअरिंग सोल्युशन) काम करत आहे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे महापालिका हद्दीमध्ये काम केल्यानंतर उर्वरित म्हणजेच वाघोलीपासून पुढे शिक्रापूर, कोरेगाव, शिरूर या भागात जिल्हा प्रशासनाकडून काम करण्यावर भर देण्यात येणार आहे.

सौरभ राव यांची जिल्हाधिकारीपदावरून पुणे महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनुक्रमे नगर रस्ता आणि महामार्गावरील वाहतूककोंडीवर संयुक्तपणे काम करण्यात येणार आहे. तसे निर्देश राव यांनी दिले असून याबाबत नवनियुक्त जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

दरम्यान, नगर महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आले आहे. या रस्त्याच्या विकासासाठी सुरुवातीला ६५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आता त्यामध्ये वाढ करत एकूण बाराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच हा महामार्ग केंद्राच्या भारतमाला प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) करण्यात येणारा वर्तुळाकार रस्तादेखील नगर रस्ता भागातून जाणार आहे. त्यामुळे पीएमआरडीएकडूनही नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘नगर रस्ता आणि जिल्हय़ाची हद्द असलेल्या महामार्गाची कोंडी सोडविणे ही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त जबाबदारी आहे. महापालिकेच्या सीमेपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाबरोबर महापालिका प्रशासन नगर रस्त्याचे एकात्मिक नियोजन करणार आहे. बंडगार्डनपासून वाघोलीपर्यंतचे दायित्व महापालिकेने घेणे आवश्यक आहे’, अशी माहिती सौरभ राव यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune nagar road traffic issue

ताज्या बातम्या