पुणे : पुण्यातील टिळक रस्त्यावरील हिराबाग येथे ११ मे १८७८ रोजी पहिले मराठी ग्रंथकार संमेलन (साहित्य संमेलन) झाले होते. त्याच परिसरात या संमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे यांना अभिवादन करून शुक्रवारी (१४ ऑगस्ट) पहिले नांदी साहित्य संमेलन’ होणार आहे. ज्योत्स्ना भोळे सभागृहातील हे संमेलन म्हणजे शतकोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वाटचालीतील सर्वप्रथम झालेल्या संमेलनाची स्मृती या स्वरुपात ते साजरे होईल.

जानेवारीमध्ये पुण्यात शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार असून त्यापूर्वी महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र आणि परदेशांमध्ये ९९ साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यापैकी नांदी साहित्य संमेलन हिराबाग येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहात शुक्रवारी सकाळी १० ते २ या वेळेत होणार असून ते फक्त विशेष निमंत्रितांसाठी असेल, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आणि या संमेलनाचे सहसंयोजक असलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी दिली.

सोमण म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या न्या. रानडे यांच्याच प्रेरणेतून स्थापन झाल्या असल्याने या नांदी संमेलनात न्या. रानडे यांच्यावरील एक नाट्यप्रवेश सादर करणार आहे. तसेच मराठी भाषेच्या व्याकरणासाठी मोलाचे योगदान दिलेल्या यास्मिन शेख आणि व्यंगचित्रकार शि. द. फडणीस या शतायुषी दिग्गजांचा मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येईल.’यानिमित्ताने मराठी भाषा, साहित्य, संशोधन आणि ग्रंथप्रसाराच्या कार्यात योगदान देत असलेल्या आणि शंभरी ओलांडलेल्या पुण्यातील काही संस्थांचा मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल, असे देशपांडे यांनी सांगितले.

नांदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हेच नांदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असतील. तसेच पुण्यात वास्तव्यास असलेल्या राजेंद्र बनहट्टी, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. श्रीपाल सबनीस, भारत सासणे आणि लक्ष्मीकांत देशमुख या माजी संमेलनाध्यक्षांची या वेळी विशेष उपस्थिती असेल. पूर्वार्धात हा सन्मान सोहळा आणि अध्यक्षीय भाषण होणार असून त्याच ठिकाणी – उत्तरार्धात महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त ‘सत्यशोधक महात्मा’ हा दीर्घाक सादर सादर केला जाणार आहे. संवाद पुणे संस्थेची निर्मिती असून त्याचे दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केले आहे. अभिजात मराठी भाषेच्या वाटचालीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा एक महत्त्वाचा टप्पा असून ऐतिहासिक पुण्यनगरीत झालेल्या पहिल्या संमेलनाच्या आठवणी यानिमित्ताने जागवल्या जाणार आहेत, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.