पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एका लाॅजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी लाॅजमध्ये छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
अभिषेक दिलीप गवळी (वय २४), राम सांडू देवकर (वय २४), महेश गणेश नागणे (वय ३४, रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. गुन्हे शाखेतील अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध कक्षाचे पथक सिंहगड रस्ता भागात गस्त घालत होते. त्या वेळी स्वर्ग एक्झिक्युटिव्ह पॅरेडाईज लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. पोलिसांनी लाॅजवर छापा टाकला. लाॅजमधून चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस कर्मचारी ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, किशोर भुजबळ, रेश्मा कंक, वैशाली इंगळे आणि पथकाने ही कारवाई केली.
कात्रज बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय प्रकरणी गुन्हा
कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या सहा महिलांविरुद्ध आंबेगाव पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. बाह्यवळण मार्गावर थांबून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांविरुद्ध या भागातील स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. बाह्यवळण मार्गावरील आंबेगाव परिसरात महिला थांबतात. या महिला वेश्याव्यवसाय करत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. या भागातील रहिवाशांना त्याचा त्रास होत होता.
पोलिसांनी या प्रकरणी सहा महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पाच अन्वये नोटीस बजावली आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने तपास करत आहेत. नवले पूल परिसरात रस्त्यावर थांबून काही महिला वेस्यावय्वसाय करत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलिसांनी तेथे कारवाई करुन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
