पुणे : राज्यातील वेगवेगळ्या भागांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांची घोषणा केवळ कागदावरच राहिली असून, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवातही करण्यात आली नाही. सध्या अहिल्यानगर-बीड-परळी, नांदेड-वर्धा या रेल्वे मार्गांचे काम सुरू आहे. मात्र, त्याला गती नाही. कोकणातून एकही गाडी पुण्यात येत नाही. याउलट राज्यातून उत्तरभारताकडे जाणाऱ्या नव्या रेल्वे गाड्यांची संख्या मध्य रेल्वेकडून वाढवण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे वाहतुक तज्ज्ञांकडून महाराष्ट्र रेल्वे परिषदेत देण्यात आली.
कोल्हापूर-सावंतवाडी-बेळगाव मार्ग, चिपळूण-कराड, रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाड्या वारंवार पाठपुरावा करूनही सुरू करण्यात येत नाही. तर, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेला जोडणाऱ्या चिंचवड-रोहा जोडणीचे कामही रखडलेच आहे. रेल्वेचे नवे मार्ग अनेकदा पहाणी, घोषणा आणि तांत्रिक अहवालांच्या चक्रात अडकत असल्याचे निरिक्षणही तज्ज्ञांनी नोंदवले.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने ‘भारतीय रेल्वे महाराष्ट्रासाठी कधी धावणार ?’ या विषयावर परिषदेचे सोमवारी आयोजन करण्यात आले. या परिषदेत रेल्वे वाहतुक तज्ज्ञ अक्षय महापदी, वैभव छाया, अर्थशास्त्राचे अभ्यासक अजित अभ्यंकर, काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप, प्रथमेश पाटील, प्राजक्ता जोशी यांनी सहभाग नोंदवला.
‘राज्यातील रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी अनेक अडचणी सांगितल्या जातात. मात्र, उत्तरभारतातल्या गाड्यांसाठी कोणत्याच अडचणी नसतात. हडपसर-जोधपूर, पुणे-जबलपूर आणि नुकतीच सुरू झालेली हडपसर-बनारस गाडी, अशी मोठी यादी सहज सांगता येते. पण, महाराष्ट्राच्या बाबतीत भिंग लावून शोधले, तरी नव्या गाड्या सापडत नाही,’ असे निरिक्षण महापदी यांनी नोंदवले. प्रवाशांचे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे जोडण्या लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘रेल्वेच्या जाळ्याबरोबर एक अर्थकारण आकाराला येत असते. रेल्वे मार्गांसाठी ५० टक्के गुंतवणुक राज्य सरकारकडून करण्यात येते. भूसंपादनही राज्य सरकार करते. त्यामुळे ५० टक्के गाड्या राज्यांच्या वाट्याला येणे गरजेचे आहे. गाड्यांचे थांबे ठरवण्याचा अधिकार रेल्वे बोर्डाला आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डात आपले प्रतिनिधी असायला हवेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया राज्यांकडून राबवण्यात यावी. तरच रेल्वेचे रोजगार स्थानिकांच्या वाट्याला येतील,’ अशी भूमिका अभ्यंकर यांनी मांडली.
‘मुंबईसह राज्यांतर्गत रेल्वे जाळे इतर राज्यांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. त्यात ७२ प्रवाशी क्षमता असलेल्या डब्यांमध्ये ५०० प्रवाशी भरले जातात. एवढ्या कमी जागेत गुदमरून जीव जाण्याची वेळही अनेकांवर येते. आता रेल्वेची तिकिट प्रणाली, व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे,’ असे वैभव छाया यांनी नमूद केले. तर, ‘रेल्वेकडून महाराष्ट्रावर अन्याय झाला. आता सर्वच पक्षांनी, लोकप्रतिनिधींनी आपापले पक्षीय भेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे,’ असे जगताप यांनी स्पष्ट केले.
प्रथमेश पाटील यांनी महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे आणि इतर राज्यातील परिस्थिती याविषयी सादरीकरण केले. प्राजक्ता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
