जुन्नर : पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथील एकलहरे गावाजवळ मोटार ही रस्ता दुभाजक तोडून विरूद्ध दिशेने चाललेल्या बसला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही दुर्घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे (रा. पिंपरी, पुणे), त्यांची पत्नी आरती (वय ४२) आणि सासू लता बाळू तूपलोंढे (वय ६३) यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा प्रेम (वय २०) आणि मुलगी मृणाल (वय १६) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन शिवराम आंबेगावे हे कुटुंबासह नाशिकहून पुण्याकडे मोटारीने चालले असताना एकलहरे गावाजवळ मोटारीचा ताबा सुटल्याने मोटार रस्ता दुभजक तोडून विरूद्ध दिशेने चाललेल्या बसला धडकली. त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. प्रेम आणि मृणाल हे जखमी झाले. या दुर्घटनेत मोटारीचा चक्काचूर झाला. तसेच दोन्ही टायर फुटले. बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले. मोटारीतून धूर येत असल्याने लक्षात येताच नागरिकांनी बॅटरीच्या वायर बाजूला केल्या. हा अपघात मागून आलेल्या वाहनामुळे किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
