पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, समाजमनात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि नराधम आरोपीला कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार)’ पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात महिला शहराध्यक्ष स्वाती पोकळे, नगरसेवक गफूरभाई पठाण, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, दिपक जगताप, युसुफ शेख, सुवर्णा सावर्डे, दिपाली कवडे, विद्या म्हात्रे, जयश्री आदमाने, रूपाली शेलार, धनश्री कराळे, मेघा सातव, श्रुती गायकवाड, हसीना सय्यद, दिलशाद खान, कीर्ती देसाई तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
नसरापूर येथे झालेली घटना दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या अघोरी कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायद्याचा धाक उरला नाही, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी
या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. “पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे” आणि “नराधमाला फाशी द्या”, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. “ही केस केवळ नियमित न्यायालयात न चालवता जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यात यावी. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी,” अशी आग्रही मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
प्रशासनाला इशारा
आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना समाजात स्थान नाही. जर या प्रकरणात दिरंगाई झाली किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शासनाने पीडित कुटुंबाला तातडीने मदत जाहीर करावी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे निवेदन स्थानिक प्रशासनाला देण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमुळे नसरापूर परिसरातील बाजारपेठ तसेच आजूबाजूच्या गावांनी बंद पाळला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नसरापुरसह आजूबाजूच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे.
