पुणे : राज्यभरात हळहळ व्यक्त झालेल्या नसरापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमावर दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. या खटल्याची सुनावणी पुणे येथील विशेष न्यायालयात सुरू झाली असून, न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याच्यावर दोषारोप निश्चित केले आहेत. घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता विचारात घेऊन या खटल्याची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ (बंद खोलीत) दररोज घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विशेष न्यायालयात सुनावणीच्या पहिल्या दिवशी आरोपी भीमराव कांबळे याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी सरकारपक्षातर्फे खटल्याचा सविस्तर घटनाक्रम मांडत ‘ओपनिंग ॲड्रेस’चा युक्तिवाद केला.
सरकारी वकिलांनी मांडलेल्या घटनाक्रमानुसार, १ मे रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान आरोपीने एका बालिकेला नसरापूर येथील राम मंदिरासमोरून गाईचे वासरू दाखवण्याच्या बहाण्याने फूस लावून पळवून नेले. त्यानंतर गाईच्या गोठ्याजवळील शेडमध्ये नेऊन तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला. आरडाओरडा करू नये म्हणून त्याने बालिकेचे तोंड दाबले आणि छातीवर प्रहार करून तिचा निर्घृण खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्नही आरोपीने केला.
‘आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे आहेत. यामध्ये सीसीटीव्ही चित्रीकरण (ज्यात आरोपी बालिकेला घेऊन जाताना दिसत आहे आणि ते दोघे शेवटचे एकत्र दिसले होते), प्रत्यक्षदर्शी बालक आणि ग्रामस्थांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) व डीएनए रिपोर्ट, मयताचा पंचनामा आणि आरोपीच्या सांगण्यावरून जप्त केलेला मुद्देमाल यांचा समावेश आहे,’ असे ॲड. अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितले. सरकारपक्षाने एकूण ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे.
दुसरीकडे, ‘अपहरण, विनयभंग आणि खुनासारखे गंभीर गुन्हे सिद्ध करण्यासाठी दोषारोपपत्रात पुरेसा आणि ठोस पुरावा नाही. ‘लास्ट सीन टुगेदर’ आणि फॉरेन्सिक पुरावे योग्य नसून आरोपीवर दोषारोप ठेवता येणार नाहीत,’ असा दावा आरोपीचे वकील ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी आपल्या युक्तिवादात केला.
मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोषारोपपत्रातील पुरावे प्राथमिकदृष्ट्या भक्कम मानत आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित केले. आरोपीने हे दोषारोप नाकारले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता इन-कॅमेरा आणि जलद गतीने दररोज होणार आहे.
