पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणात पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी सायंकाळी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. ‘आरोपीला कठोर शिक्षा हाेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असून, पोलीस तुमच्या सोबत आहेत. माझ्याशी तुम्ही कधीही संपर्क साधा, मी तुमच्या घरी येईन,’ अशा शब्दांत अमितेशकुमार यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांना आश्वस्त केले.
भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (१ मे) घडली. या घटनेनंतर पुणे शहर, तसेच भोर, नसरापूर भागात संतप्त पडसाद उमटले. विविध संस्था, संघटनांकडून आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
संतप्त नागरिकांनी शनिवारी सायंकाळी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर रास्ता राेको आंदोलन केले होते. त्या वेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी कुटुंबीयांची भेट घेतली.
या घटनेनंतर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गेले दोन दिवस त्यांनी जेवणही केलेले नाही, ही बाब पोलीस आयुक्तांनी समजली, तेव्हा, ‘कुटुंबीयांची काळजी घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, दोन दिवस त्यांनी जेवण केले नाही, त्यांंची वैद्यकीय तपासणी करा,’ अशा सूचना त्यांनी तेथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
‘पोलिसांकडून त्रास नाही’
‘नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर बाह्यवळण मार्गावर आंदोलन झाले. हे आंदोलन नागरिकांनी केले. हे आंदाेलन सुरू असताना काही गोष्टी घडल्या. आम्हाला पोलिसांनी त्रास दिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून आराेपीला कठोर शिक्षा होण्यासाठी सूचना द्याव्यात,’ असे कुटुंबीयांनी सांगितले.
सहपोलीस आयुक्तांना निवेदन
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकारी कीर्ती फाटक यांनी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांची सोमवारी भेट घेतली. त्यांनी शर्मा यांना निवेदन दिले. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
