पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्यचार करुन तिचा खून करणारा आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी दोषी ठरवले. ‘हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ आहे. आरोपी कांबळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी विनंती विशेष ससकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने सरकार पक्ष, तसेच बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून निकाल राखून ठेवला आहे. येत्या सोमवारी (२९ जून) न्यायालय निकाल जाहीर करणार आहे.
नसरापूर अत्याचार प्रकरणात सरकार पक्ष आणि बचाव पक्षाने अंतिम युक्तिवाद पूर्ण केला. ‘आरोपी कांबळे याने केलेले कृत्य घृणास्पद , क्रुर आणि समाजमन हादरवणारे आहे. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा द्यावी’, असे विशेष सरकारी वकील मिसर यांनी युक्तीवादात नमूद करुन सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या १२ महत्त्वपूर्ण निकालाचा संदर्भ दिला. ‘महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात आहेत. कायदे अस्तित्वात असताना अशा प्रकारचे गुन्हे घडतात. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना कायद्याचा धाक बसविण्यासठी कठोर शिक्षा देण्यात यावी,’ असे मिसर यांनी युक्तिवादात सांगितले.
सरकार पक्षाने सादर केलेला डीएनए अहवाल, न्यायवैद्यकीय पुरावे, सीसीटीव्ही चित्रीकरण, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष विचारात घेतल्यास आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले, असे न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी स्पष्ट केले. ‘या प्रकरणातील पुरावे सबळ आणि ठोस आहेत. आरोपी कांबळेच्या बचावातील मुद्दे ग्राह्य धरता येत नाही, असे मिसर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी काम पाहिले. ॲड. मिसर यांना ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सहाय केले. पीडित बालिकेच्या कुटुंबीयांच्या वतीने ॲड. राधिका नावंदर-जोशी, ॲड. मनीष पाडेकर यांनी बाजू मांडली.
आरोपीचा बचाव फेटाळला
आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयात बचाव केला. ‘घटनेच्या दिवशी घायवळ यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये गेलाे होताे. तेथे बालिका आली होती. तिला गाठी शेव खाण्यास दिली. गोठ्याकडे नेत असताना बालिकेचा पाय घसरला. तिच्या डोक्याला मार लागला. ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवून तेथून गेलो’, असा बचाव कांबळे याने न्यायालयात केला होता. वैद्यकीय पुरावे, घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांची साक्ष या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने कांबळे याचा बचाव फेटाळून लावला होता. ‘पीडित बालिकेच्या शरीरावर १८ गंभीर जखमा आढळून आल्या होत्या. आरोपीने बालिकेवर अत्याचाार करुन तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापूर्वी त्याने दोन महिलांवर अत्याचर केल्याचे प्रकार नोंद आहेत’, असे सरकारी वकील मिसर यांनी युक्तिवादात सांगितले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
गुन्हा शाबीत करण्यासाठी पोलिसांनी दिलेले पुरावे हे परिस्थितीजन्य आहे. आरोपी हा गुन्हेगार आहे, हे सिद्ध करणारी घटनेची साखळी उलगडण्यात आली नाही. त्याला पुरक पुरावे सादर करण्यात आले नाहीत. हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ नाही, असे बचाव पक्षाचे वकील ॲड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी युक्तिवादात सांगितले.
न्यायालयात बंदोबस्त; नागरिकांकडून फाशीची मागणी
महाराष्ट्र दिनी बालिकेवर अत्याचार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले होते. या खटल्याचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे. गुरुवारी न्यायालयात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी पीडित बालिकेचे कुटुंबीय, विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी घोषणाबाजी करण्यात आली. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
पीडित बालिकेच्या वडिलांची कठोर शिक्षेची मागणी
या खटल्याच्या अंतिम सुनावणीला पीडित बालिकेचे वडील उपस्थित होते. ‘अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना पोलीस, न्यायव्यवस्था सोडत नाही, असा संदेश या खटल्याच्या निकालातून देण्यात यावा. आराेपीला कठोर शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी पीडित बालिकेच्या वडिलांनी या वेळी केली.
न्यायालयातील घटनाक्रम
- न्यायालयाकडून आरोपीच्या नावाची विचारणा
- आरोपीविरुद्ध दाखल कलमे शाबीत झाल्याचे न्यायालयाने सांगितले.
- प्रत्येक कलमातील शिक्षा सांगण्यात आली.
- घटनेच्या दिवशी काय केल्याची विचारणा
- आरोपीचा न्यायालयात पुन्हा बचावाचा प्रयत्न
