पुणे : नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याच्याविरुद्ध शुक्रवारी सहा साक्षीदारांनी साक्ष नोंदविली. पीडित बालिकेची आई, वडील, तसेच घटनास्थळाचा पंचनामा करणारे पंच, आरोपीला बालिकेसोबत पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवून घेण्यात आली.

भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात महाराष्ट्र दिनी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक केली. या प्रकरणात कांबळे याच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी (२८ मे) आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्यात सरकार पक्षाकडून ८२ साक्षीदारांची यादी विशेष न्यायालयात सादर करण्यात आली. पहिल्या सहा साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी शुक्रवारी (२९ मे) विशेष न्यायालयासमोर नोंदविली. बचाव पक्षाकडून ॲड. हिंमतराव जाधव यांनी साक्षीदारांची उलटतपासणी घेतली.

या प्रकरणात पीडित बालिकेच्या आई-वडिलांची साक्ष नोंदविण्यात आली; तसेच घटनास्थळाचा पंचनामा करणाऱ्या पंचांची साक्ष नोंदविण्यात आली. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी कांबळे हा बालिकेला घेऊन निघाल्याचे दिसून आले होते. त्याला प्रत्यक्षदर्शींनी पाहिले होते. दोन प्रत्यक्षदर्शींची साक्ष न्यायालयासमोर नोंदविण्यात आली.

‘नसरापूर अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगतीने चालविण्याचा आदेश देण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध आरोप निश्चित झाल्यानंतर साक्षीदार तपासण्यात येणार आहेत, तसेच उलटतपासणीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. हा खटला लवकरात लवकर निकाली काढून आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे,’ असे ॲड. मिसर यांनी सांगितले.

पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्याची मागणी

आरोपी कांबळे याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमवाढ करण्यात यावी, असा अर्ज सरकार पक्षाकडून विशेष न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.