पुणे : राष्ट्रीय महामार्गांवर अनेक ठिकाणी नियमितपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे तिथे बेकायदा वाहनतळ निर्माण होऊन वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अशा ५९५ बेकायदा वाहनतळांवर कारवाईची देशव्यापी मोहीम हाती घेतली असून, त्यात पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. या मोहिमेमुळे महामार्गावरील प्रवास विनाअडथळा आणि सुरक्षित होणार आहे.

देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर बेकायदा वाहनतळांची समस्या गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी वाहने महामार्गांच्या शेजारी वाहने उभी केली जातात, तसेच अतिक्रमणे केली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होते. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरात सर्वेक्षण केले. त्यात देशभरात ५९५ बेकायदा वाहनतळ समोर आले. यानंतर प्राधिकरणाने राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि इतर शासकीय यंत्रणांशी समन्वयातून बेकायदा वाहनतळांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हा महामार्ग सुरक्षा कृती पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकाचा प्रमुख असलेला अधिकारी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून कारवाईला गती देणार आहे, अशी माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

मुंबई-बंगळुर महामार्गावर पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदा वाहनतळांची समस्या आहे. खेड शिवापूर परिसरात मोठ्या प्रमाणात मालमोटारी व इतर वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहतात. त्यामुळे तिथे बेकायदा वाहनतळ निर्माण झाला आहे. अनेकवेळा वाहने महामार्गावर उभी राहिल्याने तिथे वाहतूक कोंडी होते. याचबरोबर याच महामार्गावर वाकड परिसरात खासगी बस उभ्या केल्या जातात. तिथेही खासगी बसचा बेकायदा वाहनतळ निर्माण झाला आहे. यामुळे वाकड परिसरातही महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. याचबरोबर चाकण आणि तळेगाव या औद्योगिक क्षेत्रात महामार्गावर अनेक ठिकाणी मालमोटारींचे असे बेकायदा वाहनतळ निर्माण झाले आहेत. सोलापूर रस्त्यावरही काही ठिकाणी हीच समस्या आहे, असे प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.

बेकायदा वाहनतळाची समस्या

  • खेड शिवापूर
  • वाकड
  • चाकण
  • तळेगाव
  • सोलापूर रस्ता
  • नाशिक रस्ता

शहरी भागात समस्या

शहरांच्या भोवतालच्या परिसरात महामार्गांवर बेकायदा वाहनतळाची समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे. अशा वाहनतळांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलासोबत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. याचबरोबर महामार्गांवरील बेकायदा वाहनतळ आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी दर महिन्याला सर्वेक्षण केले जात आहे. तसेच, प्राधिकरणाच्या गस्ती पथकांकडून कारवाईची मोहीम नियमितपणे सुरू आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.