‘आनंद द्या, आनंद घ्या’ हे ब्रीदवाक्य असलेल्या ‘नाट्यपुष्प, पुणे’ संस्थेने नुकतेच एकांकिका महोत्सवाताचे आयोजन केले. सादरीकरण करणाऱ्यांबरोबरच उपस्थितांनीही आनंद घेण्याच्या व्रताला न्याय दिला. अशा या महोत्सवाविषयी…
आपल्या भोवताली घडणाऱ्या विषयांना वाचा फोडण्यासाठी, त्यातून आपली समज आणखी समृद्ध होण्यासाठी एकांकिका महोत्सवासारखे मंच उपयोगी असतात. कलेची अभिव्यक्ती हा त्याचा पैलूही उपयुक्तच. नाट्यपुष्प संस्थेने नुकत्याच आयोजिलेल्या एकांकिका महोत्सवाने हेच भरभरून दिले. एकांकिकांत जे विषय मांडले गेले, त्यांचा हा कोलाज.
लग्नसंस्था टिकवायची असेल, तर विवेकाबरोबरच पती-पत्नीमध्ये संवाद, एकमेकांना समजून घेण्याची भूमिका आवश्यक असते. तीन स्त्रियांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या आधारावर आणि नात्यांचा खरा अर्थ शोधणारी ‘उंबरठा’ ही एकांकिका या तत्त्वावर उभी राहिलेली. ‘सखी नाट्याविष्कार मंचा’ने ती प्रस्तुत केली. लेखन आणि दिग्दर्शन डॉ. गिरिजा लगड यांचे होते. संगीत अतुल कुंटे, प्रकाशयोजना सुधन्वा पानसे आणि नेपथ्य निशांत तेंडोलकर यांचे होते.
एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेला भेटलेल्या अनोळखी व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाभोवती फिरणारी ‘स्ट्रेंजर’ ही नितीन बगवाडकर यांनी लिहिलेली एकांकिका. अतुल कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेली ही एकांकिका गूढतेचे वलय निर्माण करणारी. ‘शब्दमाग’ संस्था तिची सादरकर्ती.
दीप्ती असवडेकर यांनी लिहिलेल्या आणि सीमा पोंक्षे व नेहा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेने प्रत्येकाला आपला उल्लेख किती महत्त्वाचा असतो आणि तो न झाल्यास कसे हिरमुसलेपण येते, हे मांडले. ‘स्टुडिओ ६४’ संस्थेने ‘आई – एक मनकल्लोळ’ या एकांकिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्यातील दुरावा जावयामुळे दूर होऊन त्यांचा मनकल्लोळ कसा संपतो, हे दाखविले. याचे लेखन वैशाली व्यास आणि दिग्दर्शन मंदारचंद्र यांनी केले होते.
नामस्मरणाचे महत्त्व सांगणारी दीप्ती असवडेकर यांचीच दुसरी एकांकिका होती ‘अनुभूती’. प्रीती वाईकर विप्रदास यांनी दिग्दर्शन केले होते. ‘अस्मिता कलामंच’ने सादर केलेली ‘अंधाराने जेव्हा सूर्य पाहिला’ या एकांकिकेचे सुप्रिया कुलकर्णी, गिरिजा लगड यांनी दिग्दर्शन केले होते. नितीन बगवाडकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या या एकांकिकेने आजच्या एकंदरच भ्रष्टाचार, विविध नागरी समस्यांवर मात करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज अधोरेखित केली. मदन करजगी यांचे संगीत होते. प्रकाशयोजना श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांभाळली होती.
संध्या कुलकर्णी यांनी लिहिलेली आणि दिग्दर्शित केलेल्या ‘स्फोट’ एकांकिकेद्वारे घरकामगार महिलांच्या जीवनातील अनुभव मांडला होता. ‘नाट्यसंकुल’ने ही एकांकिका सादर केली. ‘रसिक कलारंजन’च्या ‘पुन्हा एकदा’ या राजश्री काळे-राजवाडे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या एकांकिकेने आयुष्य चांगले जगायचे म्हणजे काय यावर भाष्य केले.
‘श्रीरंग साधना’ने सादर केलेल्या ‘रिक्त’ एकांकिकेचे लेखन आरुषी दाते यांनी, तर दिग्दर्शन ज्ञानेश्वर ढमाळ यांनी केले होते. एका अपूर्ण नात्याची पूर्ण गोष्ट यात सादर करण्यात आली. संगीत आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी निरंजन देशपांडे, अक्षय यांनी सांभाळली होती, तर समन्वयकाच्या भूमिकेत होते सतीश कारेकर.
वेगवेगळ्या नऊ विषयांवरील एकांकिका. प्रसंगांना न्याय देणारे दिग्दर्शन. कलाकारांचा पूरक अभिनय आणि प्रेक्षकांची भरभरून मिळणारी दाद. ‘नाट्यपुष्प’ संस्थेने आयोजित केलेला एकांकिका महोत्सव असा उत्साहाने भारून गेला. हेमलता रघु, सीमा पोंक्षे, नेहा कुलकर्णी या कुशल संयोजकांनी तो सुफळ केला.
