Pune Navale Bridge Accident: पुणे शहरातील नवले पुलावर आज साडे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणार्या कंटेनर, ट्रक आणि एका चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत ट्रकला भीषण आग लागलेली दिसत आहे. आग लागलेला ट्रक रस्त्यावरून जाताना दिसून येत आहे. दरम्यान, घटनास्थळी अजूनही मदतकार्य सुरू आहे.
या अपघातात जखमी नागरिकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशामक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. तर अपघाताच्या घटनेमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातात कारमधील आठ वर्षांच्या चिमुकलीसह दोन पुरुष व दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारमधील पाच जण नारायणपूर येथून देवदर्शनाहून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. तसेच या अपघातात कंटेनर चालक व एका क्लिनरचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे : नवले पुलावर सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर, ट्रक आणि चारचाकी वाहन एकमेकांवर आदळून विचित्र अपघात घडला आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून या अपघातात सात जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. (व्हायरल व्हिडीओ)#Pune #Video #Accident pic.twitter.com/8Of2YaDPaj
— LoksattaLive (@LoksattaLive) November 13, 2025
साताराहून मुंबईच्या दिशेने कंटेनर जात होता. नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढील सहा ते आठ वाहनांना कंटेनर चालकाने उडवल्याने तसेच ट्रक आणि कंटेनरच्यामध्ये एक चार चाकी अडकल्याने आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये सात जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
