पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने काँक्रीट पंप वाहणाऱ्या टेम्पोला धडक दिली. अपघातात टेम्पोतील २२ वर्षीय कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. कंटेनरने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले.

संदीप जगन्नाथ कुमार (वय २२, रा. नरहटी, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कंटेनर चालक धनराज गणपतलाल वैष्णव (वय २४, सध्या रा. रामसर, जि. अजमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नऱ्हे पोलसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरुन शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव कंटेनर मुंबईकडे निघाला होता.

काँक्रीट पंप वाहून नेणारा टेम्पो मुंबईकडे निघाला होता. नवले पुलाजवळ भरधाव कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. कंटेनरनने पाठीमागून टेम्पोला धडक दिली. धडकी एवढी जोरात होती की टेम्पोच्या मागील बाजूचा चुराडा झाला. टेम्पोतील कामगार संदीप कुमार हा गंभीर जखमी झाला. कंटेनरनने एका मोटारीसह ट्रकला धडक दिली. अपघातात टेम्पोतील दोन कामगार जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभाग आणि नऱ्हे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप कुमार याच्यासह सहा जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच संदीप कुमार याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातात कंटेनर चालक वैष्णव हा जखमी झाला. ससून रुग्मालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण तपास करत आहेत.

अपघातानंतर वाहतूक विस्कळीत

अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.