पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ झालेल्या किरकोळ अपघातानंतर एका मराठी मालिकेतील अभिनेत्रीला दोघांनी धमकाविल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दाेघांविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या बाबत एका अभिनेत्रीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (११ सप्टेंबर) रात्री मुंबईहून साताऱ्याकडे अभिनेत्री मोटारीतून निघाली होती. नवले पुलाजवळ मोटारीचा किरकोळ अपघात झाला. अपघातानंतर दुसऱ्या एका मोटारीतील दोघांनी अरेरावी केली. त्यांनी गैरवर्तन केले. त्यानंतर दोघे जण मोटारीतून पसार झाल्याचे अभिनेत्रीने फिर्यादीत म्हटले आहे.

अभिनेत्रीने समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केली आहे. ‘किरकोळ अपघाताच्या कारणावरून महिलेशी अरेरावी करणे चुकीचे आहे. महिलांच्या सुरक्षेचा विचार व्हावा. अरेरावी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी’, असे अभिनेत्रीने समाज माध्यमात प्रसारित केलेल्या चित्रफितीत म्हटले आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.