पुणे : महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) माध्यमातून उभारण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर क्लीन एनर्जी अँड ग्रीन हायड्रोजनचे गुरुवारी लोकार्पण करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून इलेक्ट्रोलायझर, फ्युएल सेल आणि बॅटरीच्या चाचणीची सुविधा उपलब्ध करु करून देण्यात आली आहे. त्यामुळे हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील नवउद्यमींसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

केंद्राचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, एनसीएलच्या व्हेंचर सेंटरचे संचालक डॉ. व्ही. प्रेमनाथ आदी या वेळी उपस्थित होते.

या केंद्राविषयी माहिती देताना डॉ. लेले म्हणाले,‘ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील पर्यायी इंधनाचा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. या तंत्रज्ञानावर आधारीत उत्पादने प्रयोगशाळेपासून बाजारात पोहचवणे अवघड असते. त्यासाठी आवश्यक तपासण्या महाग असतात. त्यामुळे नवीन उद्योगांना ही साधने परवडत नाहीत. हीच अडचण ओळखून या केंद्रात चाचणी सुविधा विकसित करण्यात आली. हे तंत्र एनसीएलच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.’

‘हायड्रोजनची घनता अत्यंत कमी असते. केवळ १ किलोग्राम हायड्रोजन साठवण्यासाठी ११ हजार लिटर क्षमतेची जागा लागते. त्यामुळे हायड्रोजन कॉम्प्रेस करुनच वापरावा लागतो. ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे. त्यामुळे हायड्रोजन साठवणूकीचे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. आता एनसीएलमधील केंद्रात २०० बार दाबापर्यंत हायड्रोजन कॉम्प्रेस करून डिस्पेंस करण्याची सुविधाही उभारण्यात आली आहे,’ त्यांनी स्पष्ट केले.

केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये

  • इलेक्ट्रोलायझर प्रतिकिलोग्राम हायड्रोजन निर्मितीसाठी किती युनिट ऊर्जा वापरतो, याचे अचूक मूल्यमापन या केंद्रात करण्यात येणार आहे.
  • जागतिक मानकांचा अवलंब करताना ५० अंश सेल्सिअस तापमानातही चाचण्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
  • या केंद्रातील सुविधा केवळ नवउद्यमींसाठी राखीव असून, त्या परवडणाऱ्या दरात उपलब्ध असतील.
  • या केंद्रात २०० बार दाबापर्यंत हायड्रोजन संकुचित (कॉम्प्रेस) करून डिस्पेंस करण्याची छोटी सुविधाही तयार करण्यात आली आहे.

‘ग्रीन हायड्रोजनमध्ये पुणे आघाडीवर’

जपान आणि चीननंतर आपला देश ग्रीन हॉयड्रोजन क्षेत्रात मोठी झेप घेत आहे. तर, पुणे हे हायड्रोजन उत्पादन, साठवणूक आणि वापर या संपूर्ण उत्पादन साखळीचे देशातील मुख्य केंद्र म्हणून विकसित होत आहे, असा विश्वास डॉ. लेले यांनी व्यक्त केला.