पुणे : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) रिक्त शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबतची चर्चा सुरू झाली असून, ही जबाबदारी कोणाकडे द्यावी, असा प्रश्न पक्षाच्या नेत्यांपुढे पडला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची आघाडी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून बैठकांचे सत्रही सुरू झाले आहे. मात्र, अजित पवार यांच्याबरोबर आघाडी करण्यास विरोध दर्शवित राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी पदासह प्राथमिक सदसत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महापालिकेसाठी येत्या पंधरा जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. मात्र शहराध्यक्षांनीच राजीनामा दिल्यामुळे शहराध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची, यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) खल सुरू झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, राज्यसभेच्या माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
विशाल तांबे यांनी महापालिकेची निवडणूक लढविणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून, पक्ष संघटनेत काम करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे शहराध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांना तूर्त शहराध्यक्षपदाची जबाबदारी नको आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदी कोणाला नियुक्त करावे, असा प्रश्न पक्षाच्या नेतृत्वापुढे आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) माजी नगरसेवकांनी भाजपसह अन्य पक्षांत प्रवेश केला आहे. त्यामुळे जुन्या जाणत्यांची उणीवही पक्षाला जाणवत असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे माजी नगरसेवक आहेत. ते निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने ते सध्या दुहेरी जबाबदारी घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत.
त्यामुळे अंकुश काकडे किंवा वंदना चव्हाण यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता आहे. त्यातही काकडे यांचा संपर्क आणि अनुभव लक्षात घेता अंकुश काकडे यांच्याकडेच निवडणुकीवेळी ही जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.
