पुणे : ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा दिला असला, तरी कट्टर धर्मवाद राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही. हा शोषित, वंचित, मागासवर्गीय, तसेच अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारा पक्ष आहे. जातीय द्वेष, धार्मिक द्वेष तसेच कोणत्याही हिंसेला पक्षात स्थान नाही,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त भाषण करताना, अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याबाबतची कारणमीमांसा करतानाच, ‘विचारांशी तडजोड केली जाणार नाही,’ असे स्पष्ट करून, कार्यकर्त्यांनाही तसे आवाहन केले.
‘आपण लोककल्याणाचा ध्यास स्वीकारला आहे. सत्ता येईल, सत्ता जाईल. परंतु, राज्यातील प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी विचार जिवंत राहिला पाहिजे. सत्तेवर असलो, तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो, तर रस्त्यांवर संघर्ष करून ही जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही,’ असे पवार यांनी सांगितले.
‘केंद्रात सत्ताधारी म्हणून काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय रोखठोक घेतले,’ असा उल्लेख करून ते म्हणाले, ‘केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना जातीय जनगणनेची केवळ चर्चा होत होती. मात्र, त्यावर काही निर्णय झाला नाही. मात्र, मोदी सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे जातींची लोकसंख्या निश्चित होणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी सत्तेत असल्यामुळे आपल्या सर्वांचाच फायदा होत असल्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बरोबर जाण्याचा प्रयत्न २०१४ पासून सुरू होता. त्याबाबत दोन ते तीन वेळा अंतिम निर्णयदेखील झाला होता. मात्र त्यानंतर भूमिका बदलण्यात आली. काँग्रेसचे सरकार असताना २६/११ चा हल्ला झाला. त्या वेळी पंतप्रधान मनमोहनसिंग होते, तर शरद पवार मंत्रिमंडळात होते. त्या वेळी दहशतवाद्यांवर काहीही कारवाई झाली नाही. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. धर्माच्या आधारावर २६ नागरिकांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत काय करू शकतो, हे दाखविले.’
‘ध्येयप्राप्तीसाठी सत्ता आवश्यक’
‘सार्वजनिक जीवनात आपण एका निश्चित ध्येयाने, धोरणाने दिवस-रात्र काम करतो आहोत. आपल्या कामातून राज्याचे भले झाले पाहिजे, सर्व क्षेत्रांत राज्य प्रथम क्रमांकावर असले पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. हे सगळे ध्येय पूर्ण करायचे असेल, तर सत्ता पाहिजे. सत्ता हे ध्येय नसले, तरी ध्येयप्राप्तीसाठी सत्ता आवश्यक असते, हे वास्तव आपल्याला विसरता येणार नाही,’ असे अजित पवार यांनी सांगितले.