पुणे : शहरात अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होत आहे. वाहने उभी करण्याचा कोणतेही धोरण महापालिकेचे नसल्याने चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केली जातात.

वाहतूक कोंडीसाठीचे एक प्रमुख कारण असलेल्या बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या ‘पे अँड पार्क’ योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने महापालिका प्रशासनाने एक पाऊल टाकले आहे. अनेक वर्ष रखडलेली ही योजना शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता आणि विमानतळ रस्त्यावर लागू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेमध्ये गेल्या टर्मला भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना आठ वर्षांपूर्वी २०१८ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शहरातील महत्त्वाच्या पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग नो हॉल्टिंग’ तसेच काही मर्यादित भागात ‘पे अँड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झालीच नाही. हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला. मात्र, राज्य सरकारने त्यावर निर्णयच घेतला नाही. दुसरीकडे पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली असल्याने पालिका प्रशासनाने त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस संयुक्तरित्या प्रयत्न करत आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासोबतच वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्तपणे उभे राहणार्‍या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ‘पे अँड पार्क’ची निविदा काढली. त्यात जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी, बालेवाडी हायस्ट्रीट, विमाननगर या रस्त्यांचा समावेश होता. त्यापैकी जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता आणि विमाननगर रस्ता या तीन रस्त्यासाठी प्रत्येकी एका ठेकेदाराने निविदा भरली होती. तर लक्ष्मी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट, बिबवेवाडी रस्ता या तीन रस्त्यासाठी एकही निविदा आली नाही.

यासाठी प्रशासनाकडून फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या. या योजनेसाठी दोन कोटी ९२ लाख ६१ हजार ९०४ रुपयांची निविदा काढली होती. प्रत्यक्षात यापेक्षा कमी दराने म्हणजे एक कोटी ७७ लाख ३५ हजार ६४० रुपयांची निविदा सादर झाली आहे. ही निविदा प्रकल्प विभागामार्फत मान्यतेसाठी स्थायी समितीला सादर करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदा मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहेत. या निविदेला मान्यता मिळाल्यास १८ तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी जाईल.

प्रायोगिक तत्वावरील या योजनेचा पहिला टप्पा प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर राबवला जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर दुकानदार व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांनी वाहने रस्त्यावर लावल्याने ग्राहकांना पार्किंगसाठी थोडीच जागा उपलब्ध होते. त्यातच अनेक चारचाकी वाहनचालक, रिक्षाचालक येथे रस्त्यातच वाहने उभी करून त्यामध्ये बसून राहतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या रस्त्यावर पे अँड पार्क योजनेच्या अंमलबजावणीनंतर वाहने लावण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे विनाकारण कोणीही रस्त्यावर थांबणार नाही. परिणामी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.