पुणे : अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्था प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर सोडतात. तसेच, कचरा विलगीकरण केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या गृहनिर्माण संस्थांनी तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यासह कचरा विलगीकरण करण्याची गरज आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसह कचरा विलगीकरण प्रक्रिया तपासण्यात येत आहे. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिला.

पुण्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कदम म्हणाले की, ‘मुळा, मुठा नद्यांच्या एका टप्प्याचे तांत्रिक सर्वेक्षण हे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि जलसंधारण विभाग संयुक्तपणे करणार आहे. तसेच, पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे.

एका त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. शहरात सांडपाणी प्रक्रिया न करता नद्यांमध्ये सोडले जाते. यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. भविष्यात सांडपाणी थेट नद्यांत न सोडता ते प्रक्रिया करून सोडले जावे, या दिशेने पावले उचलण्यात येत आहेत. पुणे महापालिकेला या प्रकरणी कारवाईची नोटीस याआधी बजाविण्यात आली होती.

पुण्यात २४ हजार टन ई-कचरा

‘ई-कचऱ्याची समस्या मोठी असून, पुण्यासारख्या शहरात दर वर्षी २४ हजार टन ई-कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. त्या बाबत जनजागृती करण्यासाठी तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था आणि विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी ‘भारत रिसायकलिंग शो’ आयोजित करण्यात आला आहे. त्यातील पहिले सत्र पुण्यात झाले असून, राज्यातील इतर ठिकाणी आणखी तीन सत्रे होतील,’ असे कदम यांनी सांगितले.

महापालिकेकडून उपाययोजनांस दिरंगाई

शहरातील प्रदूषण रोखण्यात पुणे महापालिका अपयशी ठरली असून, या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच नोटीस बजावली आहे. घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि हवा प्रदूषण या बाबत महापालिकेकडून पुरेशा उपाययोजना केल्या जात नसल्याचा ठपका मंडळाने ठेवला आहे. या प्रकरणी महापालिकेला उपाययोजना करण्यास १५ दिवसांची मुदत देण्यात आली. पुण्यातील वाढत्या प्रदूषणाबाबत मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

या बैठकीत महापालिकेने उपाययोजनांचा कृती आराखडा सादर केला होता. मात्र, त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महापालिकेला नोटीस बजावून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बाबासाहेब कुकडे यांनी दिले.