बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरफोड्या करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजित व्यंकप्पा पवार असं आरोपीचं नाव असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आरोपीला जेरबंद केलं. त्याच्याकडून ३३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तो त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने घरफोड्या करत असल्याचं पोलीस तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बंद घराचे लोखंडी गज कापून सराईत गुन्हेगार अजित पवार हा त्याच्या साथीदारांसह घरफोड्या करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांना मिळाली. माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी त्याच्या पथकाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी अजित पवार हा औरंगाबाद येथील वाळूज येथे लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर राम गोमारे यांच्या पथकाने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी वेषांतर करून चार दिवस त्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली. नंतर वाळूज पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी अजितने सोने खरेदी करणारे व्यापारी संदीप अंकुश केत याला सोन्याचे दागिने विकले होते. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता घरफोड्यातील मुद्देमाल विकत घेतल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यामध्ये ३३ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.