पुणे : शहरात गणेशोत्सवापूर्वी १०० महिला स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी करून महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही केली. मात्र, गणेशोत्सव महिनाभरावर आला असताना निविदा प्रक्रियाही सुरू झालेली नाही. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबणा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची सुविधा मिळावी, यासाठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महिलांसाठी १०० स्वच्छतागृहे उभारण्याचे जाहीर केले. मात्र, गणेशोत्सव एक महिन्यावर आला असताना महिला स्वच्छतागृहांसाठी निविदाप्रक्रियेला अद्यापही सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात महिलांना स्वच्छतागृहांची सुविधा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर प्रशासक्रात संपुष्टात येऊन महापालिकेत लोकप्रतिनिधी आले. त्यानंतर महापालिकेचे चालू वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अंदाजपत्रक तयार करताना त्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणा केली. शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गर्दीच्या ठिकाणी तसेच स्वारगेट पुणे टेशन शिवाजीनगर या बस स्थानकांच्या आणि एसटी स्थानकाच्या भागातही महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन स्थायी समितीचे अध्यक्ष भिमाले यांनी शंभर स्वच्छतागृहांची घोषणा अंदाजपत्रकात केली होती.

दरम्यान, शहरात कसबा पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या गर्दीच्या भागांमध्ये देखील महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत. काही सार्वजनिक स्वच्छतागृहे असली, तरी स्वच्छता आणि देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जाते. याबाबत अद्याप धोरण तयार करण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अल्पना वरपे म्हणाल्या, शहरात नवीन १०० स्वच्छतागृहे गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणे अवघड आहे. मानाच्या पाच गणपतींसह ज्या भागात भाविकांची मोठी गर्दी होते, त्या ठिकाणी पुरेशा संख्येने मोबाइल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी महापालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला पत्र देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, शहरात महिलांच्या १०० स्वच्छतागृहांसाठी जागांची निश्चिती करण्यात आली आहे. निविदांचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सादर केला जाणार आहे. त्यानंतर महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होईल. मात्र, गणेशोत्सवापूर्वी महिला स्वच्छतागृहे उपलब्ध होणार नाहीत.