पुणे : शहरातील विविध भागांत बेकायदा सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या, पानटपऱ्या रात्री दहा वाजता बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. मात्र, शहरातील हाॅटेल, रेस्टाॅरंट, बार हे ठरवून दिलेल्या वेळेनुसार बंद करण्यात येणार आहेत. ‘नाईट लाईफ’च्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालणे, तसेच बेशिस्तांविरुद्ध कारवाईसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा गेल्या आठवड्यात आढावा घेण्यात आला. रात्रीच्या वेळी पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी झाली होती. बेकायदा सुरू असलेल्या गाड्यांवर गर्दी झाली होती. रात्री अपरात्री सुरू असलेल्या गाड्यांमुळे गैरप्रकार होतात. नियमाप्रमाणे रात्री दहा वाजता पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

शहरात खून, खुनाचा प्रयत्न, माराामारी अशा प्रकारचे गुन्हे वाढले आहेत. गु्न्हेगारी घटना वाढल्यानंतर रात्री पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहणी केली. शांततेचा भंग, रहिवाशांच्या तक्रारी विचारात घेऊन पोलिसांनी वेळेत पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील डेक्कन चौपाटी, नळ स्टाॅप चौक, कर्वेनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर, हडपसर, कोंढवा, बाणेर, कात्रज भागात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असल्याचे दिसून आले होते.

पुण्यात जमावबंदी नव्हे; प्रतिबंधात्मक आदेश

‘शहरातील कायदा आणि सुव्यवस्था विचारात घेऊन प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येतात. दर १५ दिवसांनी या बाबतचे सुधारित आदेश पोलिसांकडून दिले जातात. २६ मे ते ८ जून या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहे. शहरात प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले नाहीत’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले. या कालावधीत स्फोटक, ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करणे, समाजमाध्यमात दहशत माजविणारी चित्रफीत प्रसारित करणे, पोलीस परवानगी शिवाय आंदोलन करण्यावर बंदी घालण्यात आली आहेत. शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आल आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागांत रात्री उशिरापर्यंत पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असल्याचे दिसून आले. नियमाप्रमाणे रात्री दहा वाजता पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद केल्या जात आहेत. शहरातील अन्य आस्थापना (हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट) ठरवून दिलेल्या वेळेत बंद होतील. – अमितेशकुमार, पोलीस आयुक्त