Loudspeaker Virodhi Punekar Manch: ‘पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत वाढलेल्या ध्वनिप्रदूषणाला राजकीय हस्तक्षेप, पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिकेची अनास्था जबाबदार असून, पुणेकरांची काळजी घेण्याऐवजी मंडळांचे हित जपणाऱ्या महापौरांनी पुणेकरांची जाहीर माफी मागावी,’ अशी मागणी ‘लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंचा’चे सदस्य मुकुंद किर्दत यांनी केली.
गणेश विसर्जनादरम्यान आवाजाने धोकादायक पातळी ओलांडल्याचे नमूद करून याला विविध घटक कसे कारणीभूत ठरले अन् पुणे पोलीस, महापालिका, राजकीय हस्तक्षेप यामुळे पुणेकरांना कसे वेठीस धरले गेले, यावर आयोजित पत्रकार परिषदेत श्रवणदोष तज्ञ डॉ. कल्याणी मांडके, डॉ. राहुल सावंत, अशोक मेहेंदळे आणि आशिष गुंजाळ यांनी भूमिका मांडली.
‘विहित नियमांची अंमलबजावणी करणे ही पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांची जबाबदारी असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयांच्या परिसरातील १०० मीटरचे शांतता क्षेत्र निश्चित करून फलक लावणे पालिका आयुक्तांना बंधनकारक होते. मात्र, ते अपयशी ठरले. तसेच, धीरज घाटे आणि इतर भाजप नेत्यांनी ‘बंधनमुक्त उत्सव साजरा करू’ अशी विधाने केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरुवातीलाच ‘डीजे’ साहित्य जप्त करून कारवाई केली, तशी ठोस कारवाई पुणे पोलिसांनी केली नाही. उत्सवात आवाजाची पातळी १२० डेसिबलपर्यंत पोहोचल्याच्या तक्रारी नोंदवूनही प्रशासनाने हात वर केले,’ असे किर्दत यांनी या वेळी केले.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाच्या डेसिबल मोजणीवर प्रश्नचिन्ह
कल्याणी मांडके यांनी प्रदूषण मंडळाकडे ध्वनी डेटाची मागणी केली असता त्यांनी ती देण्यास नकार देत माहिती लपवली. त्यामुळे शासनाच्या डेसिबलवरच प्रश्नचिन्ह आहे असे त्यांनी स्पष्ट करत सीओईपी महाविद्यालयाची ध्वनी मोजण्याची ठिकाणे २० वर्षांपासून ठरलेली आहेत. ध्वनी मोजताना तो कुठून, कसा व स्रोतापासून किती अंतरावर मोजला यावरच सर्व अवलंबून असते आणि असा आवाज हुबेहूब पुन्हा मोजणे कठीण असते.
हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ
गेल्या काही वर्षात विसर्जन मिरवणुकीमध्ये आवाजाची पातळी वाढल्याने याचा प्रतिकूल परिणाम हृदयावर होत असून रुग्ण वाढले आहेत अशी माहिती हृदयरोगतज्ञ डॉक्टर राहुल सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
