पुणे : आषाढ महिन्यात सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ होते. रविवारी (२ ऑगस्ट) संकष्टी चतुर्थी असल्याने मटण, मासळीकडे खवय्यांनी पाठ फिरवली. पुढील रविवारी (९ ऑगस्ट) एकादशी आहे. हक्काच्या दोन्ही रविवारी सामिष पदार्थांचा बेत हुकल्याने सामिष खवय्यांचा हिरमोड झाला आहे.

आषाढ महिन्यात सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनला मागणी वाढते. मित्र, नातेवाइकांबरोबर पार्टीचे बेत आखले जातात. यंदा अधिक मास असल्याने खवय्यांनी सामिष पदार्थ वर्ज्य केले होते. आषाढ महिन्यातील रविवार सामिष खवय्यांचा हक्काचा दिवस असतो. रविवारी सकाळी बाजारात जाऊन मटण, मासळी, चिकनची खरेदी केली जाते. मित्र, नातेवाइकांना आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. काही जण हाॅटेलमध्ये पार्टीचे बेत आखतात.

‘रविवारी (२ ऑगस्ट) संकष्टी चतुर्थी असल्याने मटण, मासळी, चिकनला फारशी मागणी नव्हती. हाॅटेल व्यावसायिक, तुरळक ग्राहकांनी मटण, मासळी, चिकन खरेदी केली. पुढील रविवारी (९ ऑगस्ट) एकादशी असल्याने मटण, मासळी, चिकनला फारशी मागणी राहणार नाही. त्यानंतर १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याचा प्रारंभ होत आहे,’ असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

पुणे शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी म्हणाले, ‘संकष्टी चतुर्थी असल्याने चिकनला फारशी मागणी नव्हती. गेल्या महिन्यात अंडी तेजीत होती. बाजारात अंड्याचा पुरवठा कमी प्रमाणावर होत होता. अंड्यांना उच्चांकी भाव मिळाला होता. गेल्या महिन्याच्या तुलनेत शेकडा अंड्याच्या दरात १८० रुपयांनी घट झाली.’

‘संकष्टी चतुर्थीमुळे मासळीला फारशी मागणी नव्हती. सुरमई, रावस, हलव्याच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. मंगळवारी (४ ऑगस्ट), बुधवारी (५ ऑगस्ट), शुक्रवारी (७ ऑगस्ट) मासळीच्या मागणीत वाढ होईल. गणेश पेठेतील मासळीबाजारात रविवारी आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा येथून मासळीची आवक झाली. खोल समुद्रातील मासळी १२ ते २५ टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी ७०० ते ८०० किलो, तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची मिळून २० ते २५ टन एवढी आवक झाली,’ अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील मासळी व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

मटण – ८४० रुपये

चिकन – २४० रुपये

पापलेट – ९०० ते २२०० रुपये

हलवा – १००० ते २००० रुपये

सुरमई – १००० ते १४०० रुपये

रावस – ९०० ते १२०० रुपये

आषाढ महिन्यात रविवारी सामिष खवय्यांकडून मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ होते. रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने फारशी मागणी नव्हती. पुढील रविवारी एकादशी असल्याने मागणी कमी राहील. आषाढ महिन्यातील दोन्ही रविवारी सामिष पदार्थांचा बेत हुकल्याने खवय्यांचा हिरमोड झाला आहे. १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याचा प्रारंभ होत आहे.- प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे शहर मटण दुकानदार संघटना