Pune to Varanasi Amrit Bharat Express: पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या नव्या रेल्वेगाड्यांना मंजुरी मिळाली असून, हडपसर ते वाराणसीदरम्यान ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. तर, पुणे-जबलपूरदरम्यान धावणारी विशेष रेल्वे (स्पेशल ट्रेन) नियमित करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
या बाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वेगाड्यांना मंजुरी दिल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. ‘पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी, वाराणसी आणि प्रयागराजला जातात. प्रवाशांची गरज ओळखून मोहोळ यांनी हडपसर ते बनारसदरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन रेल्वे मंत्रालयाने ‘अमृत भारत’ रेल्वेला मंजुरी दिली. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांनाही थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल,’ असे मोहोळ यांनी नमूद केले.
‘नव्या रेल्वे गाड्यांमुळे पर्यटनच नाही, तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, त्यामुळे आगामी सुट्ट्यांच्या काळात पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे-जबलपूर रेल्वे नियमित
पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी नियमित करण्यात येणार असून, गाडी क्रमांक २०१६१/२०१६२ ‘पुणे-जबलपूर एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना वर्षभरआधी आरक्षण करणे शक्य होणार आहे.
पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वेची गरज होती. आता ‘अमृत भारत’ एक्सप्रेसची मंजुरी आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुणेकरांच्या सुविधेसाठीचा पाठपुरावा कायम सुरू राहील. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
