scorecardresearch

पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना शेवटची संधी ; तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर

यंदा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी नाही

पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना शेवटची संधी ; तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी मिळणार आहे. तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना १९ आणि २० सप्टेंबरला अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येईल. तिसऱ्या फेरीची निवड यादी २३ सप्टेंबरला जाहीर होईल.

हेही वाचा >>> पुणे : हिंदुराष्ट्र सेनेचा तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला करणारे आणखी दोन आरोपी अटकेत

माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर दोन विशेष फेऱ्या अशा एकूण पाच फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र अद्यापही काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नसल्याने आता तिसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. या फेरीचे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना १९ आणि २० सप्टेंबरला अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येईल. तसेच गरज असल्यास प्रवेश रद्द करून पुन्हा प्रवेश अर्जाचा भाग दोन, पसंतीक्रम भरून या फेरीत सहभागी होता येईल. २१ सप्टेंबरला भरलेला अर्ज प्रमाणित करून घ्यावा लागेल. तिसऱ्या फेरीची निवड यादी २३ सप्टेंबरला जाहीर होईल. तर २३ आणि २४ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे आदी प्रक्रिया होईल.

हेही वाचा >>> पुणे : भेंडी, गवार महाग ; पितृपंधरवड्यामुळे फळभाज्यांना मागणी

विशेष फेरीमध्ये दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या पूर्वी अर्ज भरलेले आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याने नव्याने संमती देणे आवश्यक असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम सुधारित करून अर्ज पुन्हा लॉक करणे गरजेचे आहे. एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाठी अर्ज भरताना सहाशेपैकी मिळालेले गुण भरावेत. तिसरी विशेष फेरी ही शेवटची फेरी असेल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवली जाणार नसल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले.

वर्ग सुरू करा…
प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग कनिष्ठ महाविद्यालयांनी सुरू करणे आवश्यक असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.