गुजराती, राजस्थानी ‘अमृततुल्य’ला मराठी चहाची टक्कर

लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकातील श्री आद्य अमृततुल्य या पुण्यातील अमृततुल्य दुकानाने शताब्दी पूर्ण केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यात चहा व्यावसायिकांची संख्या वाढली; मराठी तरुणांचा टक्का अधिक

पृथ्वीतलावरचे अमृत असे चहाचे वर्णन केले जाते. दवे आणि पटेल यांची चलती असलेल्या अमृततुल्य व्यवसायामध्ये आता मराठी माणसांनी केवळ पाऊलच टाकले असे नाही, तर  दिवसेंदिवस चहा व्यवसायातील मराठी टक्का वाढताना दिसून येत आहे. ‘आमची कोठेही शाखा नाही’, अशी पाटी अभिमानाने मिरवणाऱ्या पुण्यामध्ये चहा व्यावसायिकांच्या शाखांचे जाळे पसरले आहे.

लक्ष्मी रस्त्यावर सोन्या मारुती चौकातील श्री आद्य अमृततुल्य या पुण्यातील अमृततुल्य दुकानाने शताब्दी पूर्ण केली आहे. पूर्वी चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये जाणे प्रतिष्ठेचे समजले जात नव्हते आणि त्या काळात लोकांची प्राप्ती ध्यानात घेता ही गोष्ट आर्थिकदृष्टय़ा परवडणारीही नव्हती. पण, नंतरच्या काळात चहाची दुकाने वाढली. ‘चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हा लागतोच’, असे म्हटले जाते. ही चहाची तल्लफ एकेकाळी अमृततुल्यमध्ये चहा घेतल्यानंतर पूर्ण होत असे. गुजरातमधील दवे आणि राजस्थानमधील पटेल यांचे अमृततुल्य व्यवसायावर प्राबल्य होते. मात्र, ही मक्तेदारी मोडून काढत मराठी माणसांनी या व्यवसायामध्ये पाय रोवले असल्याचे चित्र दिसते.

मंडईजवळील बुरुड गल्लीमध्ये दहा वर्षांपूर्वी राम रेणुसे या युवकाने ‘साई प्रेमाचा चहा’ ही टपरी सुरू केली. वेलदोडा, आलं, सुंठ, गवती चहा, चहा मसाला अशा कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याचे टाळून निव्वळ चहा पिण्याचा आनंद ‘प्रेमाचा चहा’ने दिला. सहा वर्षांपूर्वी बदामी हौदाजवळ छोटेसे दुकान घेतलेल्या रेणुसे यांनी दीड वर्षांपूर्वी मोठय़ा दालनामध्ये स्थलांतर केले. आता ‘साई प्रेमाचा चहा’च्या विविध आठ शाखा कार्यरत असून त्यामध्ये दोन शाखांची भर पडत आहे.

‘येवले चहा एकदा पिऊन तर पाहा’ या जाहिरातीचा ध्वनी कानावर पडतच चहाचा आस्वाद घेण्याचा आनंद देणाऱ्या ‘येवले चहा’ने तर या व्यवसायाची समीकरणेच बदलून टाकली आहेत. पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील येवले कुटुंबाचा मूळचा दुधाचा व्यवसाय होता. शिल्लक राहणाऱ्या दुधामुळे चहाच्या हॉटेलची कल्पना दशरथ येवले यांच्या मनात आली. सॅलिसबरी पार्क भागात गणेश अमृततुल्य नावाने व्यवसाय केल्यानंतर भारती विद्यापीठ परिसरात जून २०१७ मध्ये येवले अमृततुल्य सुरू केले. येवले चहाच्या चवीला उत्स्फूर्त प्रसिद्धी मिळाली. नवनाथ, गणेश, नीलेश हे बंधू आणि याच परिवारातील मंगेश आणि तेजस अशा येवले बंधूंचे संचालक मंडळ कार्यरत आहे. फरासखान्यासमोर दुसरी शाखा सुरू झाली आणि येवले चहाची चर्चा सुरू झाली. सदाशिव पेठ, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, मामलेदार कचेरी, कोंढवा, वाघोली अशा विविध ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत. कोथरूड येथील वनाज कंपनीजवळ येवले चहाची १७ वी शाखा शनिवारपासून (१ सप्टेंबर) कार्यरत होत आहे. चहाच्या व्यवसायातून येवले कुटुंबाने प्रगती साधली आहे. चहाचे चाहते वाढले असल्यामुळे चहा व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत असे म्हणता येते.

समीकरणेच बदलून टाकली आहेत. पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील येवले कुटुंबाचा मूळचा दुधाचा व्यवसाय होता. शिल्लक राहणाऱ्या दुधामुळे चहाच्या हॉटेलची कल्पना दशरथ येवले यांच्या मनात आली. सॅलिसबरी पार्क भागात गणेश अमृततुल्य नावाने व्यवसाय केल्यानंतर भारती विद्यापीठ परिसरात जून २०१७ मध्ये येवले अमृततुल्य सुरू केले. येवले चहाच्या चवीला उत्स्फूर्त प्रसिद्धी मिळाली. नवनाथ, गणेश, नीलेश हे बंधू आणि याच परिवारातील मंगेश आणि तेजस अशा येवले बंधूंचे संचालक मंडळ कार्यरत आहे. फरासखान्यासमोर दुसरी शाखा सुरू झाली आणि येवले चहाची चर्चा सुरू झाली. सदाशिव पेठ, शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, मामलेदार कचेरी, कोंढवा, वाघोली अशा विविध ठिकाणी शाखा सुरू झाल्या आहेत. कोथरूड येथील वनाज कंपनीजवळ येवले चहाची १७ वी शाखा शनिवारपासून (१ सप्टेंबर) कार्यरत होत आहे. चहाच्या व्यवसायातून येवले कुटुंबाने प्रगती साधली आहे. चहाचे चाहते वाढले असल्यामुळे चहा व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत असे म्हणता येते.

उच्चशिक्षित चहा व्यवसायात

  • सदाशिव पेठेमध्ये ब्राह्मण मंगल कार्यालयासमोर ‘कडक स्पेशल’ हे चहाचे दुकान अजित केरूरे यांनी सुरू केले आहे. अभियंते असलेल्या केरूरे यांनी आपल्या अभियांत्रिकी पदवीची फ्रेम दुकानामध्ये लावली आहे.
  • सिंहगड इन्स्टिटय़ूट येथून नोकरीतून कमी केलेले प्राध्यापक महेश तनपुरे यांनी नऱ्हे येथे ‘जस्ट टी’ हे दुकान सुरू करून चहाच्या व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune number of tea business growers the percentage of marathi youth is more