पुणे : पुण्यातील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेत तेजीचे वारे निर्माण झाले आहे. जागतिक क्षमता केंद्रे आणि कार्यालयीन जागा सहकार्यासाठी कार्यालयीन जागांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर तिमाहीत पुण्यात कार्यालयीन जागांचे ३२ लाख चौरस फुटांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांत पुण्याने मुंबईला मागे टाकले आहे. यामुळे तिसऱ्या तिमाहीत मुंबईपेक्षा पुण्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यानी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

‘कॉलिअर्स इंडिया’ने देशातील सात महानगरांतील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेचा जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, देशभरात या तिमाहीत कार्यालयीन जागांचे १ कोटी ८७ लाख चौरस फुटांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार झाले. आधीच्या तिमाहीत (एप्रिल ते जून) हे व्यवहार १ कोटी ७४ लाख चौरस फूट होते. त्यात आता ७ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात कार्यालयीन जागांचे सर्वाधिक व्यवहार बंगळुरूत झाले असून, ते ५२ लाख चौरस फूट आहेत. त्या खालोखाल दिल्ली ३३ लाख चौरस फूट, पुणे ३२ लाख चौरस फूट, मुंबई २४ लाख चौरस फूट, हैदराबाद २२ लाख चौरस फूट, चेन्नई २० लाख चौरस फूट आणि कोलकता ४ लाख चौरस फूट असे व्यवहार झाले आहेत.

कार्यालयीन जागांच्या व्यवहारात देशात पुणे तिसऱ्या स्थानी, तर मुंबई चौथ्या स्थानी आहे. पुण्यात या तिमाहीत कार्यालयीन जागांचे ३२ लाख चौरस फुटांचे भाडेतत्त्वावरील व्यवहार झाले. आधीच्या तिमाहीत हे व्यवहार १२ लाख चौरस फुटांचे होते. त्यात आता १६७ टक्के वाढ झाली आहे. नवीन कार्यालयीन जागांचा पुरवठा पुण्यात या तिमाहीत ३९ लाख चौरस फूट आहे. तो आधीच्या तिमाहीत १४ लाख चौरस फूट होता. त्यात आता १७९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. मुंबईत या तिमाहीत कार्यालयीन जागांचे २४ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले असून, आधीच्या तिमाहीत ते २० लाख चौरस फूट होते. त्यात आता २० टक्के वाढ झाली आहे. याच वेळी मुंबईत या तिमाहीत नवीन कार्यालयीन जागांचा पुरवठा केवळ ८ लाख चौरस फूट असून, तो आधीच्या तिमाहीत २१ लाख चौरस फूट होता. त्यात आता ६२ टक्के घट नोंदविण्यात आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कार्यालयीन जागांच्या पारंपरिक मागणीत तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असून, त्या खालोखाल बँकिंग, वित्तीय सेवा, विमा (बीएफएसआय) क्षेत्र असून, अभियांत्रिकी आणि निर्मिती क्षेत्राकडूनही मागणीत वाढ होत आहे. याच वेळी कार्यालयीन जागा सहकार्यालाही मागणी वाढत असून, एकूण व्यवहारात त्यांचा वाटा २१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आगामी काळात तो आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. – विमल नाडर, राष्ट्रीय संचालक, कॉलिअर्स इंडिया

कार्यालयीन जागांचे व्यवहार (जुलै ते सप्टेंबर)

  • महानगर – भाडेतत्त्वावरील व्यवहार (लाख चौरस फूट)
  • बंगळुरू – ५२
  • दिल्ली – ३३
  • पुणे – ३२
  • मुंबई – २४
  • हैदराबाद – २२
  • चेन्नई – २०
  • कोलकता – ४