पुणे: औंध भागात दहशत माजवून पसार झालेल्या सराइतांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. सराइतांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काेयते, मोटार, दुचाकी असा सात लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रतीक सुनील कदम (वय २६), अमीर अल्लाउद्दीन शेख (वय २८), , समीर अल्लाउद्दीन शेख (वय २६), जय सुनील घेंगट (वय २१), अभिषेक अरुण आवळे (वय २४, सर्व रा. कस्तुरबा गांधी वसाहत, ओैंध), अतुल श्याम चव्हाण (वय २८, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, ओैंध), राॅबिन दिनेश साळवे (वय २६, रा. दर्शन पार्क, ओैंध) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत एका तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र ओैंधमधील ‌विधाते वस्ती भागात २८ जून रोजी गप्पा मारत थांबले होते. आरोपी आणि फिर्यादी तरुणाचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. आरोपी आणि त्यांच्याबरोबर असलेले साथीदार विधाते वस्ती परिसरात आले. तरुण, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. दांडके आणि कोयते उगारून परिसरात दहशत माजविली.

तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मिात्रावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काेयते, मोटार आणि दुचाकी जप्त करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, हिमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, बाबुलाल तांदळे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर यांनी ही कामगिरी केली.