Explore Pune One Day Trip destinations including top historical and religious spots : पुणे शहर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. इथे जितका इतिहास रेंगाळतो, तितकीच आधुनिकताही खुणावते. पण धावपळीच्या युगात अनेकांना संपूर्ण शहर फिरणे शक्य होत नाही. अशा पर्यटकांसाठी एका दिवसात पुणे दर्शन घडवणारा एक ‘परफेक्ट प्लॅन’ आम्ही घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊया पुण्यातील अशी काही ठिकाणे जी तुम्ही एका दिवसात नक्कीच पाहू शकता.

दगडूशेठ हलवाई मंदिर

दगडूशेठ हलवाई मंदिर

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे.मंदिरातील गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य आणि सुंदर आहे. सध्याची मूर्ती १९६८ मध्ये मूर्तिकार शंकरअप्पा शिल्पी आणि नागेश शिल्पी यांनी साकारली आहे. हे मंदिर पुण्यातील बुधवार पेठ परिसरात असून, गणेशोत्सवा दरम्यान येथे भव्य मंदिरांच्या प्रतिकृती (महाल) साकारल्या जातात, ज्या पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत हे मंदिर चालू असते. त्यामुळे पुण्यातील पर्यटनाची सुरुवात तुम्ही दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून करू शकता.

लाल महल

लाल महल

दगडूशेठ हलवाई मंदिरापासून अगदी काही मिनिटे चालत गेल्यानंतर तुम्हाला लाल महल दिसेल. कसबा पेठेत असलेले हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणातील वास्तव्यासाठी ओळखले जाते. शिवरायांनी आपल्या बालपणातील बराच काळ याच महालात व्यतीत केला. स्वराज्याची पहिली स्वप्ने त्यांनी याच मातीत पाहिली.मुळचा लाल महाल काळाच्या ओघात नष्ट झाला होता. सध्याची लाल विटांची वास्तू पुणे महानगरपालिकेने १९८८ मध्ये स्मरणीय स्मारक म्हणून उभारली आहे.या महालाच्या छतावर चार छत्र्या आहेत, जे त्याचे प्रमुख आकर्षण आहे.जिजामाता आणि बाल शिवरायांचे सुंदर कोरीव शिल्प येथे आहे. साधारणपणे सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत हे स्मारक खुले असते.

शनिवार वाडा

शनिवार वाडा

पुण्यातील शनिवार वाडा हे पेशव्यांचे ऐतिहासिक निवासस्थान आणि मराठा साम्राज्याच्या सत्तेचे मुख्य केंद्र होते.मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, गणेश दरवाजा, दरवाजा आणि दिल्ली दरवाजा असे एकूण ५ दरवाजे या वाड्याला आहेत. त्यापैकी दिल्ली दरवाजा हा वाड्याचा मुख्य आणि सर्वात मोठा दरवाजा आहे, जो उत्तर दिशेला (दिल्लीच्या दिशेने) तोंड करून आहे. यावर हत्तींना रोखण्यासाठी लोखंडी खिळे ठोकलेले आहेत. सकाळी ८ ते संध्याकाळी ६.३० पर्यंत शनिवार वाडा पर्यटकांसाठी खुला असतो. दररोज संध्याकाळी येथे मराठी आणि हिंदी भाषेत ‘लाईट अँड साऊंड शो’ होतो, ज्यामध्ये पेशव्यांचा इतिहास सांगितला जातो.

राजा दिनकर केळकर संग्रहालय

पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालय हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय म्हणजे डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांनी आयुष्यभर जतन केलेल्या कलेचा अनमोल खजिना आहे. केळकरांनी हे संग्रहालय त्यांचा मुलगा ‘राजा’ याच्या अकाली निधनानंतर त्याच्या आठवणीत उभारले. डॉ. केळकरांनी सुमारे ६० वर्षे देश फिरून २१,००० पेक्षा जास्त प्राचीन व दुर्मिळ वस्तू गोळा केल्या. १९७५ मध्ये त्यांनी हा संग्रह महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्द केला. शुक्रवार पठेतील बाजीराव रोडवर हे संग्रहालय आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत संग्रहालय खुले असते. प्रौढांसाठी साधारण १०० रुपये ते १२० रुपये आणि लहान मुलांसाठी (१२ वर्षांखालील) ३० ते ५० रुपये दरम्यान तिकिट असते. छायाचित्रणासाठी (Photography) अतिरिक्त शुल्क आकारले जाते. संपूर्ण संग्रहालय नीट पाहण्यासाठी साधारण २ ते ३ तास लागतात.

आगा खान पॅलेस

आगा खान पॅलेस

येरवडा येथील नगर रोडवरील आगा खान पॅलेस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. पुण्यात भीषण दुष्काळ पडलेला असातना स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी परोपकारी भावनेतून ८९२ मध्ये हा राजवाडा बांधला.कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांचे बंदिवासात असतानाच येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे दगडी समाधी बांधण्यात आल्या आहेत. महात्मा गांधींच्या अस्थींचे काही अंशही येथे ठेवण्यात आले आहेत.राजवाड्यात गांधीजींच्या वापरातील वस्तू, जसे की त्यांचा चरखा, चपला, भांडी आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.हा राजवाडा १९ एकर परिसरात पसरलेला असून त्याच्या सभोवती सुंदर बागा आहेत. याच्या बांधकामात इटालियन कमानी आणि विस्तीर्ण व्हरांडे पाहायला मिळतात. दररोज सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत आगा खान पॅलेस खुले असते. भारतीय नागरिकांसाठी साधारण ३० रुपये आणि परदेशी पर्यकांसाठी ३०० रुपये आहे. २००३ मध्ये भारतीय पुरातत्व विभागाने (ASI) याला ‘राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक’ म्हणून घोषित केले आहे.

पार्वती हिल

पार्वती हिल

पुण्यातील पर्वती हिल (Parvati Hill) हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते पुण्यातील सर्वात उंच आणि निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. टेकडीवर चढण्यासाठी सुमारे १०३ भव्य दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या इतक्या रुंद आहेत की त्या काळी हत्ती देखील यावरून वर जाऊ शकत असत.टेकडीवर एक छोटे संग्रहालय आहे, जिथे पेशवे काळातील शस्त्रे, नाणी, हस्तलिखिते आणि दुर्मिळ चित्रे पाहायला मिळतात. येथे नानासाहेब पेशव्यांची समाधी देखील आहे.टेकडीवरून संपूर्ण पुणे शहराचे विहंगम दृश्य दिसते. विशेषतः सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी होते.मंदिर सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले असते. संग्रहालय सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत खुले असते. टेकडीवर जाण्यासाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु संग्रहालयासाठी नाममात्र शुल्क आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी गेल्यास हवामान खूप छान असते आणि चढणे सोपे जाते.

महत्त्वाच्या टिप्स:

प्रवास: ही सर्व ठिकाणे शहराच्या मध्यभागात असल्याने तुम्ही रिक्षा किंवा कॅबने सहज फिरू शकता. तुमची स्वतःची गाडी असेल तर उत्तमच.
खाद्यसंस्कृती: शनिवार वाडा आणि दगडूशेठ मंदिर परिसरात पुण्याचे प्रसिद्ध मिसळ-पाव किंवा सुजाता मस्तानीचा आस्वाद नक्की घ्या.
वेळ: आगा खान पॅलेस आणि केळकर म्युझिअम दुपारी ५.३० ते ६ च्या सुमारास बंद होतात, त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे.