पुणे : पावसाने ओढ दिल्याने नवीन लाल कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला असून, लाल कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. कांद्याच्या दरात दीड महिन्यात किलोमागे २५ रुपयांची वाढ झाली. दरवाढीची ही झळ किमान दीड ते दोन महिने ग्राहकांना सोसावी लागेल, असा अंदाज आहे.

‘यंदा पावसाने ओढ दिल्याने नवीन लाल कांद्याची लागवड उशिराने होईल. लाल कांद्याची लागवड नाशिक, पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, आंबेगाव, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगाेंदा, पारनेर परिसरात मोठ्या प्रमाणावर केली जाते. लाल कांद्याचा हंगाम उशिरा सुरू होणार असल्याने कांदा दरात दीड महिन्यात किलोमागे २५ रुपयांनी वाढ झाली. दीड महिन्यापूर्वी घाऊक बाजारात एक किलो कांद्याला १८ ते २५ रुपये दर मिळाला होता. घाऊक बाजारात सध्या एक किलो कांद्याला ४२ ते ५० रुपये दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात कांद्याची विक्री ६० ते ७० रुपये किलो दराने केली जात आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डातील कांदा व्यापारी राम नरवडे यांनी दिली.
चौकट

कांद्याच्या तेजीमागील कारणे

‘मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, मंचर, आंबेगाव, तसेच पारनेर, श्रीगोंदा परिसरातून कांद्याची आवक होत आहे. दक्षिणेकडील राज्यांत कांद्याची लागवड होते. मात्र, तेथे पावसाने ओढ दिल्याने लागवडीवर परिणाम झाला. गेली दोन वर्षे कांद्याला दर मिळाला नव्हता. आता दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. नवीन लाल कांद्याचा हंगाम सुरू होण्यास दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत कांद्याचा दर तेजीत राहील,’ अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गेली दोन वर्षे कांद्याला कवडीमोल दर मिळाला. उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. सध्या दर मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे.- नितीन थोरात कांदा उत्पादक, आमदाबाद, ता. शिरूर, जि. पुणे

पावसाने ओढ दिल्याने कांदा लागवडीवर परिणाम झाला. बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणावर होत आहे. साठवणुकीतील कांद्याची आवक होत आहे. नवीन लाल कांद्याचा हंगाम सुरू होण्यास वेळ लागणार असल्याने किमान दीड ते दोन महिने कांद्याचा दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. – राम नरवडे, कांदा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड