शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरप्रकारात अपात्र ठरवण्यात आलेल्या ५७६ शिक्षकांचे ऑगस्टपासूनचे वेतन न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालयाने नुकतेच दिले. त्या पाठोपाठ आता माध्यमिकच्या ४४७ शिक्षकांचेही वेतन न देण्याचे आदेश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले असून, प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १ हजार २३ शिक्षकांचे वेतन थांबवण्यात आले आहे.

टीईटी परीक्षा २०१९ मध्ये झालेल्या गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे आणि कारवाई निश्चित करण्यासंदर्भात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. तसेच या यादीतील परीक्षार्थी जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत असल्यास आणि या सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालकांनी त्यांच्या स्तरावरून पुढील आदेशापर्यंत शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. संबंधित उमेदवारांचे आधार कार्ड आणि शालार्थ आयडीनुसार मॅपिंग करण्यात आले असता अपात्र उमेदवारांपैकी ५७६ उमेदवार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक कार्यरत आहेत आणि वेतन अनुदान घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे ऑगस्टपासून वेतन थांबवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्या पाठोपाठ आता माध्यमिकचे ४४७ शिक्षक राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आल्याने व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी संबंधितांचे ऑगस्टपासूनचे वेतन थांबवण्याचे पत्र सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, भविष्य निर्वाह निधी पथक, महापालिकांचे प्रशासन अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषद, कटक मंडळांचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

शालार्थ आयडी गोठवण्यात आलेल्या उमेदवारांची नावे ऑगस्टच्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता लक्षात घेऊन सदरचे वेतन देयक रद्द करावे. संबंधितांचे नाव वेतन देयकातून वगळून ऑगस्टचे वेतन देयक तयार करून अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान देण्यात यावे. शालार्थ आयडी गोठवण्यात आलेल्या उमेदवारांचे ऑगस्टपासूनचे वेतन अनुदान ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी संबंधित उमेदवारांना वेतन अनुदान किंवा फरक देयक दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अन्य अपात्र उमेदवारांची पडताळणी करण्याची सूचना –

परीक्षा परिषदेने संकेतस्थळावर अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अपात्र उमेदवारांची शहानिशा करून वेतन थांबवलेल्या ४४७ उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये आढळल्यास त्यांचे शालार्थ आयडी गोठवण्याबाबत संचालनालयाला कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात आहेत.