पुणे: अवघ्या २८व्या वर्षी नियतीने हिरावून नेलेल्या एका युवकाच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या असह्य दुःखाच्या क्षणी कुटुंबीयांनी घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने त्याच्या मृत्यूला अर्थ दिला. युवकाच्या अवयवदानामुळे चार गरजू रुग्णांना नवजीवनाची आशा मिळाली असून, त्याच्या जाण्यानंतरही तो चार जणांना जीवनदान देऊन गेला.
हा युवक रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. ९ ऑगस्ट रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावर पत्रे ठोकण्याचे काम सुरू असताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपचार निष्फळ ठरले. वैद्यकीय निकषांनुसार त्याला मेंदूमृत (ब्रेन स्टेम डेथ) घोषित करण्यात आले.
दुःखातही घेतला माणुसकीचा मोठा निर्णय
कुटुंबाचा कर्ता आणि अवघ्या २८ वर्षांचा तरुण अचानक गमावल्याचे दुःख कुटुंबीयांसाठी असह्य होते. अशा परिस्थितीत अवयवदानाचा निर्णय घेणे कठीण होते. मात्र, कुटुंबीयांनी मनावर दगड ठेवून ‘आपला माणूस गेला, पण त्याच्या अवयवांमुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात’ या भावनेतून अवयवदानास संमती दिली.
या एका निर्णयाने दुःखाचे रूपांतर आशेत झाले. युवकाच्या शरीरातील अवयव आता विविध रुग्णालयांत प्रत्यारोपणासाठी पोहोचले असून, चार रुग्णांच्या आयुष्यात नव्या पहाटेची शक्यता निर्माण झाली आहे.
‘ग्रीन कॉरिडॉर’ने पुण्यासह नाशिकला पोहोचले अवयव
या अवयवदानातून फुफ्फुस पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात, यकृत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात, तर दोन्ही मूत्रपिंडे नाशिक येथील किंग्स मानवता हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी पाठविण्यात आली आहेत. या अवयवांमुळे चार गरजू रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळाली आहे.
मृत्यूनंतरही अस्तित्व राहणार चार आयुष्यांत
या निधनाने कुटुंबाचा आधार हरपला; पण कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे त्याचे अस्तित्व चार अनोळखी कुटुंबांच्या आयुष्यात कायमचे कोरले गेले आहे. एका तरुणाचा मृत्यू चार कुटुंबांसाठी जीवनाची नवी आशा ठरला आहे.
दुःखाच्या क्षणी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून अवयवदानास संमती देणाऱ्या कुटुंबीयांचे हे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अवयवदान केवळ अवयवांचे दान नसून, ते कोणालातरी पुन्हा श्वास घेण्याची, जगण्याची आणि आपल्या कुटुंबासोबत भविष्य पाहण्याची संधी देणारे जीवनदान आहे, हेच या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.
