पुणे : सध्या जागतिक तापमान वाढीचे मोठे संकट जगातील प्रत्येक देशासमोर आहे. कोणत्याही वेळी, कुठेही पाऊस पडतो आहे. तापमानात होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. याच चिंतेतून संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत २०१५ मध्ये ‘पॅरिस करार’ करण्यात आला होता. जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यासाठी हा करार करण्यात आला होता.
यंदा ‘जागतिक हवामान न्याय आणि स्थानिक उपाययोजना’ (Global Climate Justice and Local Action) या संकल्पनेवर आधारित अशाच हवामान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ब्राझीलच्या बेलें शहरात १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. परिषदेत २०३० च्या हवामान उद्दिष्टांवर (Global Stocktake) चर्चा आणि पुढील दशकासाठी देशांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
जगभरातील पर्यावरणप्रेमी आणि हवामान बदलाचे अभ्यासक, विविध राष्ट्रांचे प्रमुख आणि धोरण निर्माते या परिषदेत सहभागी होणार आहे. पुण्यातील ‘बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’ ही संस्था या परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
‘बीएआयएफ’ ही संस्था ६० वर्षांपासून शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. बीएआयएफ ही ‘यूएनएफसीसीसी’ची (UNFCCC) ‘Observer Organisation’ आणि ‘यूएनसीसीडी’ची (UNCCD) मान्यताप्राप्त संस्था आहे. ग्रामीण भागातील सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय प्रगतीसाठी बीएआयएफने अनेक उपक्रम राबवले आहेत. जागतिक हवामान परिषदेत परिषदेत बीएआयएफकडून भारतातील ग्रामीण भागाच्या दृष्टीकोनातून हवामान बदलाविषयीच्या चर्चेत महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत. त्याबरोबरच संस्थेची पर्यावरणपूरक प्रारूपे परिषदेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती ‘बीएआयएफ’चे विश्वस्त डॉ. भारत काकडे यांनी निवेदनाद्वारे दिली.
‘विकसनशील देशांसाठी न्याय्य हवामान वित्तपुरवठा, एकात्मिक जल आणि अन्न व्यवस्थापन, स्थानिक पातळीवर हवामान कृतीसाठी नवकल्पनांचा वापर या विषयांवर भर दिला जाणार आहे. हवामान बदलामुळे ग्रामीण भागातील शेती, पाणी, आणि रोजगार या तिन्ही क्षेत्रांवर मोठा परिणाम होत आहे. स्थानिक पातळीवरील उपाय योजनांना जागतिक चर्चेशी जोडून प्रत्यक्ष बदल घडविण्याचे बीएआयएफचे उद्दिष्ट आहे. स्वच्छ ऊर्जा, शाश्वत शेती आणि परिपूर्ण अर्थव्यवस्था (Circular Economy) या क्षेत्रात विस्तारयोग्य मॉडेल्स विकसित करण्यासाठी संस्थेचे काम सुरू आहे.
सीओपी-३० मध्ये आम्ही जागतिक हवामान धोरणांचे स्थानिक कृती आराखड्यात रूपांतर कसे करता येईल, यावर भर देणार आहोत. हवामान वित्त, नवकल्पना आणि उद्योजकतेच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. – डॉ. भारत काकडे, अध्यक्ष-विश्वस्त, बीएआयएफ
सीओपी-३० बद्दल थोडक्यात :
सीओपी-३० (Conference of the Parties) ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल कराराअंतर्गत होणारी वार्षिक परिषद आहे. या परिषदेत जगभरातील नेते, वैज्ञानिक, स्वयंसेवी संस्था आणि उद्योग प्रतिनिधी एकत्र येऊन हवामान बदलाविरुद्धची धोरणे आणि कृती आराखडे निश्चित करतात. यंदा २०३० च्या हवामान उद्दिष्टांवर (Global Stocktake) चर्चा करण्यात येणार असून, पुढील दशकासाठी देशांच्या जबाबदाऱ्यांचे नियोजन या परिषदेत केले जाणार आहे.
