पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन झाल्यानंतर पालखी मार्गावर तयार झालेला कचरा महापालिकेच्या घनकचरा विभागाने स्वच्छ केला. एका रात्रीमध्ये महापालिकेने रस्त्यावरील कचरा साफ करून २७१ टन कचऱ्याचे संकलन केले. महापालिकेच्या ११२० सेवकांनी पालखी मार्गावर सेवा देऊन रस्ते स्वच्छ केले.

महापालिकेच्या वतीने दोन्ही पालख्यांचे शहरात स्वागत करण्यात आले. ज्या मार्गाने पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाला. त्या मार्गावर तयार झालेला कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे यांनी सांगितले, की शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतील ११२० सेवकांनी पालखी मार्ग रात्रीत स्वच्छ केला. यामध्ये २७१ टन कचरा गोळा करण्यात आला. यात ५४ टन ओला, तर २१७ टन सुका कचरा होता.

हा कचरा महापालिकेच्या सेवकांनी वेगळा केला. संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यात प्लास्टिकचा कचरा आणि जुन्या चपलांचे प्रमाण सर्वाधिक होते. पालखी मार्ग पूर्ववत स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबविली. ज्या ठिकाणी पालखी मुक्कामी आहे. त्यासह पालखी तळ आणि आजूबाजूच्या परिसरात नियमित साफसफाई केली. वारकरी, भाविकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या कामांवर विशेष भर दिला असून, ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी भाविकांसाठी महापालिकेच्या वतीने आवश्यक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान नागरिक आणि वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन सर्व यंत्रणांसह सातत्याने कार्यरत असल्याची माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी दिली.

संत तुकाराम महाराज यांची पालखी जुना पुणे मुंबई रस्त्याने बोपोडी मार्गे पुणे शहराच्या हद्दीत दाखल झाली होती. वाकडेवाडी मार्गे शिवाजीनगर पोलीस परेड मैदान, नामदार गोपाळकृष्ण रस्त्याने, लक्ष्मी रस्त्याने पालखी मुक्कामस्थळी आली. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी कळस मार्गे पुणे शहरात आली. विश्रांतवाडी, फुलेनगर, संगमवाडी पुलावरून शिवाजीनगर, संत ज्ञानेश्वर महाराज चौक, फर्ग्युसन महाविद्यालय, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पोहचला.

पालखी सोहळा एका भागातून पुढे मार्गस्थ होताच. त्या मार्गावर जमा झालेला कचरा गोळा करत रस्ते तातडीने स्वच्छ केले जात होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना अस्वच्छतेचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याची माहिती घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.