पुणे : ‘पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि संघटनांकडून जागोजागी मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावले जातात. तसेच फटाकेदेखील फोडले जातात. यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना व्यत्यय येतो. भजन आणि अभंग गाताना अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पालखीच्या स्वागतासाठी ध्वनिक्षेपक आणि फटाक्यांवर बंदी घालावी,’ अशी मागणी पालखी सोहळा प्रमुखांनी पुण्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे केली.

संत ज्ञानेश्वर महाराज, तसेच संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे जाताना दोन दिवस पुणे मुक्कामी असतो. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा महापौरांनी घेतला. या वेळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापालिकेतील पक्षनेते, पोलीस अधिकारी, तसेच पालखी सोहळा विश्वस्त उपस्थित होते. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. यावर योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘पालखी मार्गावरील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे, स्वागत मंडळाकडून पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणे, ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देताना पालखी आगमन व प्रस्थान मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी,’ असे आदेश महापौर नागपुरे यांनी प्रशासनाला दिले.

पालखी मुक्कामी असलेल्या मुख्य ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय तपासणी व आवश्यक सेवा केंद्रे उभारण्यात यावीत. तसेच, शाळा व प्रशासकीय यंत्रणा यांचा योग्य समन्वय साधून कार्यवाही करण्यात यावी. भाविकांच्या सोयीसाठी पीएमपी बससेवा योग्य ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. बोपोडी परिसरात पालखी जाताना तीव्र चढ-उतार असल्याने तेथे ‘हाइट बॅरिअर’ उभारण्याची सूचना करण्यात आली असून, संबंधित काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत तातडीने पूर्ण करावे. उत्सव काळात प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्यात यावे.

संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी आगमनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता, होळकर पुल परिसरातील पाच तासांचा कालावधी कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, पालखी सोहळा ज्या मार्गावरून जातो त्या प्रमुख मार्गांवर सर्व सोयीसुविधा पूर्ण केल्यानंतर त्याचे संपूर्ण नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा. आवश्यक असल्यास ‘रेनकोट’ व आदी साहित्याचीही उपलब्धता सुनिश्चित करावी.

बोपोडी व खडकी परिसरात पालखी विश्रांती वेळ सुमारे १५ मिनिटे निश्चित करण्यात येणार असून, भाविकांना दर्शन घेण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘मुक्काम बदलाचा निर्णय घेतलाच नाही’

‘शहरात दाखल होणाऱ्या पालखीचा मुक्काम बदलण्याचा कोणताही निर्णय पालखी सोहळा समितीने घेतला नसल्याचे या बैठकीत विश्वस्तांनी स्पष्ट केले. याबाबत कोणतीही घोषणा सोहळा समितीच्या वतीने करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण बैठकीसाठी उपस्थित विश्वस्तांनी दिले, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.