पुणे : ‘यंदा पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात येणार आहेत. सुरक्षिततेसाठी प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवण्यात येणार असून, त्यासाठी ‘फेस रेकग्निशन’ कॅमेरे, ‘ॲडव्हान्स्ड व्हिडिओ ॲनॅलिटिक्स’ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्तांसह सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, संजय पाटील, तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. ‘पालखी सोहळ्यातील प्रत्येक घडामोडीवर कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी हे कॅमेरे जोडण्यात आले आहेत. याद्वारे वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे,’ असे अमितेशकुमार यांनी सांगितले.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन गुरुवारी बोपखेल येथे होईल. पालखी विश्रांतवाडीमार्गे शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ, लक्ष्मी रस्ता या मार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी जाईल. श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुना मुंबई-पुणे रस्तामार्गे शहरात दाखल होईल. नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात पालखी मुक्कामी जाईल.

‘पालखी साेहळ्यात भाविकांच्या गर्दीत दागिने, मोबाइल संच हिसकाविण्याच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून पोलिसांकडून पालखी मार्गावरील प्रमुख चौकांत बंदाेबस्त ठेवण्यात येणार आहे, तसेच मुक्कामी दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था (रांग) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाँम्ब शोधक-नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दलाची पथके (क्युआरटी) तैनात करण्यात येणार आहेत,’ असे आयुक्तांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘पालखी सोहळ्याच्या आगमनाबाबत माहिती देण्यासाठी यंदाही लाइव्ह लोकेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पालखी मार्ग, तसेच मुक्कामी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे आगमन आणि प्रस्थान सोहळा सुरळीत पार पडावा, या दृष्टीने पालखी सोहळ्याचे प्रमुख, विश्वस्त, दिंडी प्रमुख यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे.’

पोलीस मदत केंद्र

  • नाना पेठ पोलीस चौकी
  • पालखी विठोबा मंदिर
  • निवडुंगा विठोबा मंदिर
  • रामाेशी गेट चौक, भवानी पेठ
  • संत कबीर चौक, नाना पेठ

दृष्टिक्षेपात बंदोबस्त

  • ४ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १३ उपायुक्त, ३० सहायक आयुक्त
  • १८२ पोलीस निरीक्षक, ५७० उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक
  • ६ हजार ५५२ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तुकड्या
  • १२५० गृहरक्षक दलाचे जवान, १२ क्यूआरटी पथके
  • ६ बाॅम्ब शोधक-नाशक पथके