पुणे : पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा देण्यासाठी महापालिकेने यंदा ‘पुणे प्रथम- सेवा वारी २०२६’ हा उपक्रम राबविला आहे. यामध्ये वारकऱ्यांना सेवा देण्याचा शब्द महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह महापालिका प्रशासनाने दिला होता. मात्र वारकऱ्यांची ‘सेवा’ ऐवजी ‘हाल’ वारी सुरु असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे यांनी केला. सार्वजनिक शौचालये वारकऱ्यांना मोफत वापरता येतील, अशी घोषणा महापालिकेने केली होती. मात्र सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यासाठी चक्क २० रुपये घेतले जात असल्याचा दावा बालगुडे यांनी केला.
गंज पेठेतील सोनवणे रुग्णालयासमोरील सार्वजनिक स्वच्छतागृहात वारकऱ्यांकडून सर्रासपणे शौचालय चालक प्रत्येकी २० रुपये वसूल करत आहे. तसेच, घोरपडे पेठेतील महर्षी अण्णासाहेब शिंदे विद्यालयात मुक्कामासाठी आलेल्या वारकऱ्यांचे सामान परस्पर बाहेर फेकण्यात आले. या प्रकारांमुळे ही महापालिकेची सेवा वारी नसून त्रास वारी असल्याची टीका बालगुडे यांनी केली.
आळंदी, देहू येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेली पालखी दोन दिवस पुणे मुक्कामी आहे. शहरात दाखल झालेल्या पालखी सोहळ्याचे स्वागत करुन वारकऱ्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी महापालिका कटीबद्ध असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी यंदा सेवावारी उपक्रम असून वारकऱ्यांची अधिकाधिक सेवा करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र वारकऱ्यांना सेवा ऐवजी गैरसोयीची आणि अपमानास्पद वागणूकच मिळत असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.
महापालिकेच्या शाळांमधील खोल्यातून वारकऱ्यांचे सामान बाहेर काढून फेकण्यात आले. त्यांना दुसऱ्या ठिकाणी मुक्कामासाठी जा, असे सुनावण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी भेट दिली असता संबंधित कक्षाला कुलूप लावण्यात आले होते, तर पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी शाळेच्या बाहेरच्या व्हरांड्यात झोपल्याचे ऋषिकेश बालगुडे यांनी सांगितले.
या प्रकराबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त वसुंधरा बारवे आणि शिक्षण प्रमुख सुनंदा वाखारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा दावा बालगुडे यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित खोलीत शाळेचे साहित्य असल्याने कुलूप लावल्याचे सांगितले. मात्र, वारकऱ्यांचे सामान बाहेर का ठेवले? त्यांना बाहेर झोपण्यास का भाग पाडले? याचे उत्तर दिले नाही. या ठिकाणी वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची देखील योग्य व्यवस्था नव्हती. जी स्वच्छतागृहे उपलब्ध होती, त्यांना कुलूप लावण्यात आल्याचे बालगुडे म्हणाले. वारकऱ्यांबरोबर झालेल्या या अन्यायकारक प्रकाराबाबत महापालिका प्रशासनाकडे येत्या सोमवारी जाब विचारणार असल्याचे बालगुडे यांनी सांगितले.
याबाबत शिक्षण विभागाच्या उपायुक्त बारवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, या शाळेत दरवर्षी १७ ते १८ दिंड्या मुक्कामी असतात. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ हे वारकरी येथे येतात. सकाळी काही वारकरी बाहेर गेले होते. त्यावेळी एका खोलीत चुकून सामान राहिले आहे, असे वाटल्याने तेथील कर्मचाऱ्याने ते बाहेर काढले. हे वारकरी आल्यानंतर पुन्हा सामान खोलीत ठेवण्यात आले. बालगुडे विनाकारण प्रशासनाची बदनामी करत आहेत.
