पुणे : पालाखी सोहळ्यात कडक बंदोबस्त तैनात असताना भाविकांकडील साडेपाच लाख रुपयांचे दागिने लांबविण्यात आल्याच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्ता, तसेच भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर परिसरात दागिने चोरीच्या घटना घडल्या. या प्रकरणी समर्थ, मांजरी, तसेच हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (९ जुलै) शहरात मुक्कामी आला. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र चाेरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी (१० जुलै) सकाळी दहाच्या सुमारास घडली. याबाबत एका ५१ वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रादार महिला या गणेश पेठेत राहायला आहेत. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या भवानी पेठेतील श्री पालखी विठाेबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर त्या रथाचे दर्शन घेत होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख दहा हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील तपास करत आहेत.
शहरातून पालखीने श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवल्यानंतर प्रस्थान मार्गावर भाविकांकडील दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या. पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी येथे शनिवारी (११ जुलै) दुपारी अ़डीचच्या सुमारास श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि साेनसाखळी असा ९० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस कर्मचारी सोनवणे तपास करत आहेत.
हडपसर गाडीतळ चौकात १० भाविकांचे दागिने चोरी
हडपसरमधील गाडीतळ चौकात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. गर्दीत एका महिलेसह दहा भाविकांच्या गळ्यातील तीन लाख ५६ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील तपास करत आहेत.
८९ संशयित ताब्यात
पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्यात भाविक, तसेच वारकऱ्यांकडील दागिने, रोकड चोरणाऱ्या ८९ संशयितांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. यामध्ये ६७ महिलांचा समावेश आहे. त्यांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
