पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शनिवारी (११ जुलै) श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी सोहळा प्रस्थानानिमित्त शनिवारी मध्यरात्री दोननंतर नाना पेठे आणि भवानी पेठेत वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

‘पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गावर आल्यानंतर सोलापूर रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. पहाटेपासून पोलिसांकडून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा,’ असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिर येथून प्रस्थान ठेवणार आहे. दोन्ही पालख्या नाना-भवानी पेठेतून लष्कर भागात येणार आहेत. तेथून पुणे-सोलापूर महामार्गाने हडपसर गाडीतळापर्यंत एकत्रित जाणार आहेत.

रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी गाडीतळ येथून सासवड रस्त्याने दिवे घाटमार्गे सासवड येथे, तर श्री तुकाराम महाराज यांची पालखी हडपसर गाडीतळमार्गे पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोर येथे मुक्कामी पोहोचणार आहे. मध्यरात्री दोननंतर टप्प्याटप्प्याने पालखी मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

वाहतुकीस बंद असणारे रस्ते

संत कबीर चौक ते बेलबाग चौक, संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज् चौक) ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील चौक, मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान, बिशप स्कूल ते मम्मादेवी चाैक, वानवडी बाजार ते मम्मादेवी चौक, ट्रायलक हाॅटेल ते महात्मा गांधी रस्ता ते रामोशी गेट चौक, मोरओढा ते भैरोबा नाला चौक, भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभूळकर चौक ते फातिमानगर चौक, सोलापूर रस्त्यावरील बी. टी. कवडे रस्ता चौक, काळूबाई मंदिर चौक, रामटेकडी, वैदुवाडी चौक, मगरपट्टा चौक, हडपसर गाव वेस (वाहतूक बंद मध्यरात्री दोन ते दुपारी दोन), सीरम चौक ते सोलापूर रस्ता, १५ नंबर फाटा ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते सासवड, खडी मशिन चौक ते बोपदेव घाट (वाहतूक बंद पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत)

पोलिसांच्या सूचना

  • पालखी प्रस्थान मार्गावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई
  • पालखी प्रस्थानानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत
  • सासवडकडे जाणाऱ्या दिंडीतील वाहनांनी भैरोबा नाला, लुल्लानगर, कोंढवा, बोपदेव घाटाचा वापार करावा
  • वाहतूक नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक – ०२०-२६६८५०००/२६६८४०००