पुणे : ‘जदुनाथ सरकारांनी मूळ साधने अभ्यासली नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत ती न आल्यामुळे मराठ्यांच्या इतिहासावर भाष्य करताना त्यांच्याकडून एक प्रकारे अन्याय झाला,’ असे मत भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव पांडुरंग बलकवडे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने आयोजित मोडी अभ्यासवर्गाच्या बक्षीस वितरण समारंभात पांडुरंग बलकवडे बोलत होते. ‘मराठ्यांच्या इतिहासातील मोडी कागदपत्रांचे महत्त्व’ या विषयावर त्यांनी भाष्य केले. मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, विश्वस्त डॉ. अनुराधा कुलकर्णी, मोडी प्रशिक्षक राजेंद्र ढुमे या वेळी उपस्थित होते.

बलकवडे म्हणाले, ‘मराठ्यांच्या इतिहासावर सापेक्ष पद्धतीने अभ्यासपूर्ण लेखन होण्यासाठी साधनांचे महत्त्व असते. आपल्या दुर्दैवाने साधनेच वाचता येत नाही, असा एक मोठा कालखंड इथे गेला आहे. याच कारणाने यदुनाथ सरकारांसारखे अभ्यासकही शिवाजी महाराजांच्या, मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करताना एक प्रकारे अन्याय करतात.’

‘इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांनी १९१० साली संशोधन प्रक्रिया सुरू केली. त्यामागे शिवाजी महाराजांचा अप्रकाशित, गळलेला आणि मराठेशाहीच्या अखेरपर्यंतचा इतिहास समोर आणण्याचे आणि शास्त्रोक्त पद्धतीने, पुराव्यावर आधारित इतिहास लिहण्याचे उद्दिष्ट होते. पूर्वजांचा गौरवशाली इतिहास असतो, तसाच पूर्वजांचा दु:खदही इतिहास अभ्यासावा लागतो,’ असेही त्यांनी नमूद केले.

बलकवडे म्हणाले, ‘मंडळाच्या अर्काइव्हमध्ये सुमारे पाच कोटी कागद आहेत. मंडळाच्या संग्रहांमध्ये अगदी वेगळ्या प्रकारची २० ते २५ लाख कागदपत्रे आहेत. राज्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई असे अर्काइव्हज् आहेत. केंद्र सरकारचे दिल्ली सरकार आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांत असणारे अर्काइव्हज् यांच्या आधारे आपण इतिहासाची वाटचाल करत असतो.’

‘सध्या किल्ल्यांचे आकर्षण असते. आपण किल्ल्यांवर जातो, ट्रेकिंग करतो. किल्ल्याची वर्तमान काळातली वास्तू, याचे वर्णन केले जाते. जिथे-जिथे मराठी राज्य पोहोचले, तिथे-तिथे मराठ्यांनी जिंकलेले किल्ले, आणि त्यांच्या ताब्यातून गेलेले किल्ले यांचा अभ्यास करताना अनेकदा किल्ला कसा वाटला हेच सांगितले जाते. त्या किल्ल्याचा शंभर-सव्वाशे वर्षांचा दफ्तरखाना असतो. त्यात किल्ला ताब्यात आल्यानंतर, त्या किल्ल्यावर मिळालेले धान्य, वस्तू आदी सगळ्या साहित्यांची नोंद केली जाते. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती कागदपत्रांतून मिळत असते. त्यामुळे कागदपत्रांचा अभ्यास गरजेचा असतो,’ असेही त्यांनी सांगितले.

‘पानिपतच्या युद्धात दीड लाख लोकांना बलिदान द्यावे लागले. हा ज्ञात इतिहास आहे. अर्ध्या तासात एवढी प्रचंड मनुष्यहानी कधीही झाली नाही. आपल्या पूर्वजांनी पानिपतच्या युद्धात गाजवलेले शौर्य, महाराष्ट्राशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले. या युद्धात केवळ सैनिकच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारे लोकंही कामी आले. त्यातील अज्ञात इतिहास समोर आणण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे,’ असेही बलकवडे यांनी नमूद केले.