पुणे : पर्वती पायथा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला शुक्रवारपर्यंत (८ मे) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी दिले.
पर्वती पायथा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच एकाने अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात संतप्त पडसाद उमटले. संतप्त नागरिकाने आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला अटक करण्यात आली. आरोपीला बुधवारी (६ एप्रिल) सायंकाळी विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
पर्वती पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने न्यायालयास माहिती दिली. ‘आराेपीने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. आरोपीने अशा प्रकारचे कृत्य यापूर्वी केले आहे का, या दृष्टीने तपास करायचा असल्याने तीन दिवस पोलीस काेठडी देण्यात यावी,’ अशी विनंती सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी युक्तिवादात केली.
आरोपीच्या वतीने विधी सेवा प्राधिकरणाचे वकील ए. ए. जीवने यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आराेपीला शुक्रवारपर्यंत (८ मे) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
पर्वती परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर मोठ्या संंख्येने नागरिक जमल्याने तणाव निर्माण झाला होता. अनुचित घटना घडण्याची शक्यता विचारात घेऊन या भागातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. बुधवारीही दिवसभर या परिसरात चोख बंदोबस्त होता.
महापौरांची पोलीस आयुक्तांशी चर्चा
नसरापूर, तसेच पर्वती परिसरातील अत्याचारांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजूषा नागपुरे यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची बुधवारी भेट घेऊन चर्चा केली. ‘पुणे शहर सुरक्षित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत’, असे नागपुरे यांनी सांगितले.
महापौर नागपुरे या बुधवारी पोलीस आयुक्तालयात आल्या. त्यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘महिलांची सुरक्षा हा संवेदनशील विषय आहे. मी एक आई आणि महिला आहे. पुणे शहर सुरक्षित होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महिला, शाळकरी मुलींमध्ये जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. शालेयस्तरावर विद्यार्थिनींशी संवाद साधणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, पोलीस, तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शहराच्या सुरक्षेसाठी काम करणे गरचेजे आहे.’
‘शहरातील निर्जन रस्ते सुरक्षित करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले आहेत. पथदिवे बसविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. टेकड्यांवरील सुरक्षेबाबत राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. पोलिसांनी टेकड्यांची सुरक्षा बळकट करण्यासाठी विविध यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. निर्जन भागात गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. उड्डाणपुलांच्या परिसरात अंधार असतो. उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नसतात. सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ याबाबत महापौरांशी चर्चा करण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नमूद केले.
