पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच मंगळवारी सायंकाळी पर्वती पायथा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना घडली. याप्रकरणी नागरिकांनी एका ५० वर्षीय व्यक्तीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर पर्वती पायथा परिसरात तणाव निर्माण झाला.
हे वृत्त समजल्यानंतर पर्वती पायथा परिसरातील नागरिक रस्त्यावर आले. अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्याने परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. ‘नागरिकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच आरोपीला ताब्यात द्यावे,’ अशी मागणी केली. या घटनेमुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता. ‘या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली असून, नागरिकांनी संयम बाळगावा,’ असे आवाहन बनसोडे यांनी केले.
