पुणे : पेशवे पार्क ते पर्वती रोप-वे प्रकल्पासाठी पुणे महापालिकेकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करणे, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासणे आणि निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी या सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने पेशवे पार्क ते पर्वती रोप-वे प्रकल्प प्रस्तावित केला आहे. यासाठी स्थायी समिती अध्यक्ष भिमाले यांनी महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रोप-वे प्रकल्प इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रकल्पाच्या नियोजनापासून निविदा प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने सल्लागार नियुक्तीसाठी ऑगस्ट २०२६ मध्ये निविदा मागविल्या होत्या. सल्लागाराला प्रकल्पाच्या रकमेच्या १.२७ टक्के किंवा किमान दोन कोटी ५४ लाख रुपये यापैकी अधिक असलेली रक्कम शुल्क म्हणून दिली जाणार आहे. या प्रकल्पाच्या जागेची पाहणी, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), अंदाजपत्रक आणि निविदेच्या अटी-शर्ती तयार करण्यात येणार आहेत.

तसेच, प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) किंवा इतर कोणत्या पद्धतीने राबविणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल, याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.

पर्वती रोप-वे प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्यास पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सुमारे तीन दशकांपासून केवळ चर्चेत असलेल्या या प्रकल्पाने पुन्हा एकदा पुढचे पाऊल टाकले आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्यास अद्याप वेळ लागणार आहे.

या प्रकल्पात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पर्वती टेकडीचे पर्यावरण, वृक्षसंपदा, धार्मिक व ऐतिहासिक वारसा आणि रोप-वेच्या उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या बांधकामाचा होणारा परिणाम. पर्यटनवाढीच्या नावाखाली टेकडीच्या नैसर्गिक रचनेला धक्का बसणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विभागाची परवानगी मिळाली असून, सल्लागाराच्या अहवालानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत निर्णय होणार आहे, असेही भिमाले यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात प्रकल्प

  • लांबी : ७५० मीटर
  • मनोरे : ५
  • मनोऱ्यांची उंची : १२ ते ४० मीटर
  • केबिन : २२
  • प्रत्येक केबिनची क्षमता : ८ प्रवासी
  • प्रवासाचा कालावधी : अडीच मिनिटे
  • वाहतूक क्षमता : एका दिशेने तासाला १५०० प्रवासी