पुणे : पारपत्रांसाठीचे (Passport) वाढते अर्ज आणि एकाच केंद्रावरील ताण कमी करण्यासाठी चाकण, हडपसर परिसरात आता नवीन पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र (POPSK) सुरू करण्यात येणार आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड येथे पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्र सुरू असून, पुण्यात आणखी दोन ते तीन केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती प्रादेशिक पारपत्र अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. उप-प्रादेशिक पारपत्र अधिकारी श्रुती पांडे या वेळी उपस्थित होत्या.
गायकवाड म्हणाले, ‘सध्या पारपत्र काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी सामान्य श्रेणीसाठी २६ दिवस, तर तत्काळसाठी २ दिवसांपर्यंतचा आहे. पुणे आणि परिसरात पारपत्रासाठीच्या अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच, इतर अनेक कारणांमुळे पारपत्र सेवा केंद्रातील व्यवस्थेवरही ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी, नागरिकांना लवकरात लवकर पारपत्र काढता यावे म्हणून फिरते पारपत्र केंद्र, पारपत्र मेळावे घेण्यात येतात. आता चाकण औद्योगिक पट्ट्यातील आणि पूर्व पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या हडपसर परिसरात नवीन दोन ते तीन पोस्ट ऑफिस पारपत्र सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना लांबचा प्रवास करून बाणेर येथे पारपत्र सेवा केंद्रात यावे लागणार नाही. तसेच गर्दी विभागल्याने पारपत्रासाठीचा प्रतिक्षा कालावधीही कमी होण्यास मदत होईल.’
‘क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाकडून पारपत्रांसाठी विशेष मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते. त्यात एका दिवसात सुमारे १ हजार ५०० अर्ज स्वीकारण्यात येतात. तर, वेगवेगळ्या भागांत मागणीनुसार ठरावीक कालावधीत फिरते पारपत्र सेवा केंद्रही सुरू करण्यात येते. पारपत्र काढण्याची संपूर्ण प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून विभागाकडून पोलीस, पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येत आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
पाच महिन्यांत २ लाखांवर पारपत्र
क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाकडून जानेवारी ते मे महिन्यादरम्यान पुणे विभागात २ लाख १७ हजार ४३९ पारपत्र देण्यात आली आहेत. या कालावधीत २ लाख २२ हजार १६९ नागरिकांनी अर्ज केले होते. विभागात गेल्या वर्षी ४ लाख ७२ हजार ९६६ पारपत्र देण्यात आले, तर ५ लाख ८ हजार ५२८ नागरिकांनी पारपत्रासाठी अर्ज केले होते, अशी माहिती विभागीय पारपत्र अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी दिली. अपुरी कागदपत्रे, अपॉइंटमेंट घेऊनही न आलेले अर्जदार आणि पोलीस पडताळणीत काही अर्ज नाकारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
नागरिकांना आवाहन
- अर्जासाठी मध्यस्थांकडे जाण्याची गरज नाही
- पारपत्रासाठी सरकारी ॲप आणि संकेतस्थळाचाच वापर करावा
- सामान्य श्रेणीत अर्ज करताना किमान सहा महिन्यांपूर्वी अर्ज करावा
- सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करावी
- अपॉइंटमेंटची तारीख चुकवू नका
