पुणे : जागा अपुरी पडत असल्याने मुंढव्यातील पारपत्र सेवा केंद्राचे (पीएसके) पाषाण येथे स्थलांतर करण्यात आले. वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधांमुळे हा निर्णय घेतल्याचे क्षेत्रीय पारपत्र अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, ३० मार्चनंतर मुंढवा केंद्राची ‘अपॉइंटमेंट’ घेतलेल्या नागरिकांनी पाषाण येथील नवीन केंद्रात त्याच तारखेला आणि दिलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील ‘मॉटक्लेयर बिल्डिंग’ या नवीन वास्तूत या केंद्राचे कामकाज सोमवारपासून सुरू झाले. या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे नवीन केंद्र अधिक सोयीचे ठरणार असून, नव्या कार्यालयात आधुनिक सुविधा असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘पुण्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत आहे. ग्लोबल कपॅसिटी सेंटर आणि काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या पुण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पारपत्राची सुविधा जलद आणि सोयीसुविधांनी युक्त असणे गरजेचे आहेत. पारपत्रासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढत आहे. वाढत्या गर्दीमुळे मुंढव्यातील पारपत्र सेवा केंद्राची जागा अपुरी पडत होती. हिंजवडी आणि परिसरातील आयटी कंपन्यांच्या दृष्टिने अंतराचाही प्रश्न होता. त्यामुळे या केंद्राचे स्थलांतर करण्यात आले. आता नव्या पारपत्र सेवा केंद्रात सुसज्ज जागा आणि अधिक सोयीसुविधा आहेत.’

‘पारपत्रासाठीचे अर्ज नाकारता येत नाहीत. पडताळणी केल्यानंतर निकषांनुसार प्रत्येकाला पारपत्र द्यायचे असते. त्यासाठीची अर्जप्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टिने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. काही प्रमाणात अर्जांची छाननी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या एका महिन्यात ४० हजारांहून अधिक सुमारे ९० टक्के अर्जदारांना पारपत्र देण्यात आले, तर कागदपत्रांच्या अभावामुळे आणि पडताळणीत आढळलेल्या त्रुटींमुळे काही अर्ज नाकारण्यात आले,’ असेही त्यांनी नमूद केले.