पुणे : जागतिक रेबीज दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात भटक्या कुत्र्यांच्या रेबीज लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एक लाख १६ हजार ३६३ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महापालिका आरोग्य प्रशासनाच्या पशू वैद्यकीय विभागाने दिली आहे.

स्ट्राँगर टूगेदर ही यंदाची अधिकृत संकल्पना असून, रेबीज आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच श्वानांचे लसीकरण आणि श्वान चावल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीबाबत महापालिका प्रशासनाने सोमवारी जनजागृती केली.

महापालिका भवनातून लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून, या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. याशिवाय, दोन डिजिटल वाहने, पाच निरीक्षण वाहने आणि नागरिकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी महापालिकेची पाच स्वतंत्र वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लसीकरणासाठी पशुवैद्यकीय अधिकारी आणि आवश्यक लशींची व्यवस्था करण्यात आली आहे.

रेबीजविषयी जनजागृती करण्यासाठी महापालिका कार्यालये, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी पथनाट्ये तसेच माहितीपत्रकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात येत आहे. २०२५-२६ पासून आतापर्यंत शहरातील ३४८ शाळांमधील एक लाख २८ हजार ३३२ विद्यार्थी, तीन हजार ७९८ शिक्षक आणि २६२ सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यासाठी निश्चित ठिकाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरात ११६ ‘फीडिंग पॉइंट’ निश्चित करण्यात आले आहेत. मानव आणि कुत्र्यांमधील संघर्ष टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार २०२०-२१ पासून ऑगस्ट २०२६ पर्यंत शहरात एकूण तीन लाख ८५ हजार १०६ मोकाट व भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये नियमित लसीकरणासह विशेष मोहिमेतील लसीकरणाचा समावेश आहे.

रेबीज प्रतिबंधासाठी विशेष लसीकरण मोहीम

पुणे महानगरपालिकेने जागतिक रेबीज दिनानिमित्त शहरात भटक्या कुत्र्यांच्या रेबीज लसीकरणाची विशेष मोहीम राबवली. २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्टदरम्यान एक लाख १६ हजार ३६३ कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. रेबीजबाबत जनजागृतीसाठी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी पथनाट्ये व माहितीपत्रकांद्वारे माहिती दिली जात आहे. आतापर्यंत ३४८ शाळांमधील एक लाख २८ हजार विद्यार्थ्यांपर्यंत जनजागृती करण्यात आली. शहरात ११६ फीडिंग पॉइंट निश्चित करण्यात आले असून, २०२०-२१ पासून ऑगस्ट २०२६ पर्यंत तीन लाख ८५ हजार १०६ कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे.